भोर : तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग, महाड-पंढरपूर मार्ग, राज्य व जिल्हा मार्ग आणि ग्रामीण भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, त्यांची चाळण झाली आहे. दुरवस्थेमुळे प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण रस्ते, पूल यामुळे वाहतुकीला अगोदरच अडथळा होत असून पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी रोडवर येऊन रस्त्यावरच दीड ते दोन फूट पाणी साचत मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अत्यंत संथगतीने वाहतूक सुरू आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावलेले नाहीत त्यामुळे रात्री-अपरात्री अपघात घडत आहेत. या शिवाय अनेक ठिकाणच्या भुयारी मार्गाची कामे अपूर्ण असल्याने रस्ता ओलांडताना अपघात घडतात दोन दिवसांपूर्वीच ससेवाडी फाट्याजवळ रास्ता ओलांडताना एका महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संपूर्ण रस्त्यांची कामे अपूर्ण असताना टोलवसुली मात्र जोरात सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत.
भोर-महाड राष्ट्रीय महामार्गाला मोठमोठे खड्डे पडले असून साईडपट्ट्या खोलवर गेल्या आहेत. अनेक पुलांना संरक्षक कठडे नाहीत, गटारे काढलेली नसून घाट रस्ता धोकादायक झाला आहे. सदरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडे हस्तांतर करण्यात आला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण यांच्या खेळात रस्ता रखडल्याने प्रवासी, पर्यटकांचे हाल होत आहेत.भोर तालुक्यातून कोकणात जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. नीरा देवघर घरण, वरंध घाट निसर्गरम्य वातावरण यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या मार्गाचा वापर करतात. मात्र हिर्डोशी गावाच्या पुढे ६ किमी तर धारमंडपच्या पुढे २ असा एकूण ८ किलो मीटरचा रस्ता वगळता संपूर्ण रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. गटारात दरडी कोसळू ती भरलेली आहेत. झाडेझुडपे वाढली असल्याने वळणावर वाहनांचा बिलकुल अंदाज येत नाही. रेलिंग खराब झाली असून अनेक पुलांना संरक्षक कठडेच नाहीत.