पिंपरी : महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून होत आहे़ त्यानंतर सत्ताधारी भाजपाने वाकडमधील रस्त्याच्या कामात रिंग झाल्याचा आरोप केला आहे.महापालिकेच्या स्थापत्यविषयक कामात तीन ते पाच ठेकेदार आळीपाळीने निविदा भरतात. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या मदतीने रिंग करतात. ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. वर्षभरातील निविदांची माहिती समोर आणली होती. त्यामुळे प्रशासनाचे बिंग फुटले होते. त्यानंतर प्रशासनाने ‘मी नाही त्यातली़़़’ म्हणून सारवासारव केली होती. निविदा प्रक्रिया किती पारदर्शक आहे, याचे ढोल बडविले होते. महापालिकेची रस्ता, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपुलाच्या कामात ठेकेदार रिंग करीत आहेत, त्यास प्रशासनाची साथ मिळत आहे, याबाबत ‘लोकमत’ने निविदांचा पोलखोल केला होता.सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देऊन निविदा चौकशीची मागणी केली आहे. तुषार कामठे म्हणाले, ‘‘स्थापत्य विभगामार्फ त प्रभाग क्रमांक २५ मध्ये तीस मीटर रस्त्याचे काम आहे. भूमकर चौक या कामासाठी २४ कोटी ४० लाखांची निविदा भरण्यात आली होती. परंतु या कामात कृष्णाई, मातेरे इन्फ्रा, धनेश्वर या तीनच ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. या तीन ठेकेदारांनी रिंग केली असून, निविदेचे पहिले पाकीट उघडले असून, दुसरे पाकीट उघडल्यानंतर कोणी रिंग केली आहे. हे लक्षात येईल. निविदा पुन्हा काढण्यात यावी.’’
रस्त्याच्या कामातही रिंग? सत्ताधारी भाजपाने घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 2:45 AM