लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : ताथवडेतील रस्त्यात ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे झालेला खोळंबा, त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेच्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागाने राडारोडा हटवून रस्ता वाहतुकीस तात्पुरता खुला केल्याने ताथवडेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवान्ना गट्टूवार, उपअभियंता संध्या वाघ, संदीप खोत, काळू नवले, भाऊसाहेब साबळे, प्रवीण धुमाळ, रवींद्र पवार यांनी या रस्त्याकडे धाव घेत पाहणी करून कामाचा आढावा घेतला येत्या चार दिवसांत तातडीने काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन रहिवाशांना दिले होते. त्यानुसार पाऊस थांबताच रस्त्यावरील राडारोडा, चिखल जेसीबीच्या साहाय्याने हटवीत रस्ता वापरासाठी तात्पुरता खुला करण्यात आला आहे. पावसाची उघडीप मिळताच डांबरीकरण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे ताथवडेकरांची त्रेधातिरपीट सुरु आहे. पावसामुळे या कामाचा फज्जा झाल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूककोंडी, अपघाते आणि वाहने चिखलात रुतण्याचे प्रकार वारंवार घडत होते आठवडाभरात अनेक दुचाकी घसरल्या होत्या, याबाबत ताथवडेतील धर्मदाय मातृत्व संस्थेचे तुषार पवार यांनी आवाज उठवत पाठपुरावा केल्याने याबाबत ‘लोकमत’ने ३० जूनच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
रस्त्याचे काम चार दिवसांत पूर्ण करणार
By admin | Published: July 06, 2017 3:11 AM