वाकड : पुनावळे रावेत बंधाऱ्यावरील हँगिंग पुलाची बुधवारी (दि. २६) ‘लोकमत’ने रावेतचा पूल बनतोय प्रेमी युगुलांचा अड्डा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्या वृत्ताची वाकड पोलिसांनी गंभीर दाखल घेत बुधवारपासूनच येथे नियमित गस्त सुरू केल्याने एरवी गर्दीने फुल्ल असलेल्या रावेत पुलाने जणू मोकळा श्वास घेतल्याचे चित्र होते. रावेत पुलावर महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे बिनदास्त चालणारे अश्लील चाळे, प्रेमाचे उघड प्रदर्शन, बिनबोभाट सुरू असलेला धांगडधिंगा, रोडरोमिओंच्या घिरट्या, त्यामुळे मुलींना चिडविणे, छेड काढणे या सर्वातून होणारे वाद आणि भांडणे या सर्वांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. तरुण-तरुणींच्या अश्लील चाळ्यांमुळे येथील नागरिकांना शरमेने मान खाली घालून येथून डोळे बंद करून ये-जा करण्याची वेळ आली होती. याबाबत ताथवडे येथील मातृत्व धर्मदाय संस्थेचे अध्यक्ष तुषार पवार व कार्यकर्त्यांनी वाकड पोलिसांकडे निवेदनाद्वारे उपाय करण्याची मागणी केली होती. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. वृत्ताची दखल घेत पोलिसांनी नियमित गस्त सुरू केली आहे.वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी याबाबत योजना आखली असून, येथे सायंकाळी ५ ते १० या वेळेत नियमित पोलिसांचा ताफा गस्त घालणार आहे. यात एक महिला अधिकारी आणि कर्मचारी असेल, गस्त घालताना काही अपवादात्मक आढळल्यास संबंधित तरुण-तरुणींना पकडून त्यांना चोप देत थेट त्यांच्या पालकांना समज देण्यात येणार आहे. जाधव यांच्या आदेशानुसार बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच वाकड ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, फौजदार सविता रूपनर, श्याम बाबा, भैरोबा यादव, सुरेश रासकर यांच्या पथक येथे गस्त घालत होते. त्यांनी अनेकांना हुसकावून लावले यामुळे पूल सायंकाळी मोकळा दिसला. दरम्यान, निगडी-प्राधिकरण परिसरातील दुर्गा टेकडी येथे रोडरोमिओंची संख्या वाढली आहे. यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या पर्यटकांना त्रास होत आहे. येथेही पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे दुर्गा टेकडी परिसरातही अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
रोडरोमिओ झाले गायब
By admin | Published: April 28, 2017 5:57 AM