लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी परिसरात प्रमुख रस्ते प्रशस्त असूनही, वाहनचालकांकडून भरधाव वेग व वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडून अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.पाच वर्षांपासून महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून रस्त्याचे रुंदीकरण करून प्रशस्त रस्ते निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ज्यांनी वाहतूक नियम बनविले ती वाहतूक पोलीस यंत्रणा कुचकामी असल्याने वाहतूक नियमांची ऐसी की तैसी दिसून येत आहे. खाकी वर्दीचा वचक कमी झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिसरातील अनेक रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू आसते. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात.वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात तरुण व टवाळखोर अल्पवयीन मुला- मुलींकडून होत आहे. वाहनचालकांकडे वाहन परवाना नसतानाही एका दुचाकीवर तीन-तीन, चार-चार जण बसून दुचाकी भरधाव वेगाने दामटताना दिसतात. वाहतूक पोलिसांनी पकडले तरी कठोर कारवाई करण्याऐवजी नेते मंडळी व वरिष्ठांच्या ओळखीमुळे चिरीमिरी घेऊन सोडून देत असल्याचे दृष्य पहावयास मिळते. मुख्य चौकांमध्ये दुचाकी उभी करून वेगवेगळ्या कर्णकर्कश आवाजात हार्न वाजवतात. या सर्व गोष्टींचा त्रास ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाला नाहक सहन करावा लागतो आहे.जुनी सांगवीत शितोळेनगर चौक, नवी सांगवीत कृष्णा चौक, फेमस चौक, शिवनेरी चौक, दापोडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शितळादेवी चौक, पिंपळे गुरवमध्ये रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, जिजामाता चौक, सृष्टी चौक आदी प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे.प्रत्येक मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; मात्र ही तपासणीची यंत्रणा शोभेची खेळणी दिसून येतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. वेग मर्यादा ओलांडणारी वाहने, त्यांचा वाहन परवाना जप्त करून अर्थिक दंड ही वसूल केला पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.पालकांच्या प्रेमापोटी लहान मुले लाडावली आहेत. अल्पवयीन असतानाही मुलांच्या लाडांमुळे व छोट्या कामांमुळे पालकही दुचाकींच्या चाव्या मुलांच्या हातात देतात. याचा परिणाम भविष्यात लहान मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्यात फेमस चौकात सोळा वर्षीय मुलाला दुचाकीच्या अपघातात आपला प्राण गमवावा लागला. - दत्तात्रय भोसले, सामाजिक कार्यकर्तेसांगवी वाहतूक पोलीस शाखेकडे पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाहन तापासणीचे काम रोडावले आहे. मात्र, अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांच्या नावे कठोर कारवाई करणार आहे. त्यासाठी तपासणी पथकांची संख्या वाढविणार आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- किशोर म्हसवडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा सांगवी
रस्ते प्रशस्त तरीही नियमांची पायमल्ली
By admin | Published: May 31, 2017 2:19 AM