पिंपरी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चिखली येथील घरकुल प्रकल्पातील रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पावणेदोन कोटींचा खर्च आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी स्वस्त घरकुल प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत राबविण्यात येत आहे. त्यासाठी चिखलीतील सेक्टर क्रमांक १७ आणि १९ मधील भूखंड घेण्यात आला. मात्र, स्वस्त घरकुल योजनेसाठी अडीच चटई क्षेत्र निर्देशांक(एफएसआय) मंजूर नसताना त्यानुसार बांधकाम करण्यात आले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर नवनगर विकास प्राधिकरणाच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत केवळ एक एफएसआयची तरतूद असल्याने महापालिकेने एक एफएसआयपेक्षा अधिक केलेले बांधकाम बेकायदा ठरते, असे म्हणत उच्च न्यायालयाने या वाढीव बांधकामाला आॅक्टोबर २०१३मध्ये स्थगिती दिली होती. दरम्यान, अडीच एफएसआय मंजुरीसाठी नवनगर विकास प्राधिकरणाने विकास नियंत्रण नियमावलीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६च्या कलम ३७नुसार फेरबदलाची प्रक्रिया पूर्ण केली. त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिल्यानंतर उच्च न्यायालयाने २९ एप्रिल २०१६ रोजी स्थगिती आदेश उठविला. त्यामुळे घरकुलातील उर्वरित २ हजार १८४ घरे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, या प्रकल्पातील रस्ते विकसित केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
घरकुल प्रकल्पातील रस्ते होणार विकसित
By admin | Published: May 29, 2016 3:48 AM