पिंपरी : पिस्तूल सदृश्य हत्याराचा धाक दाखवून बँकेचा मॅनेजर तसेच गॅरेजवाल्याला लुटले. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी बुधवारी (दि. १) सांगवी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
अनिकेत उर्फ उऱ्या आकाश उरणकर (वय २१, रा. मार्केटयार्ड, पुणे), विघ्नेश गुणशीलन रंगम (वय २२, रा. पिंपळेगुरव), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पहिल्या प्रकरणात मौहमद सुबहान यामीन शेख (वय २७, रा. बोपोडी, पुणे) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे पिंपळे गुरव येथे ऑटो वर्ल्ड नावाचे गॅरेज आहे. फिर्यादी त्यांच्या गॅरेजमध्ये मंगळवारी (दि. ३१) रात्री साडेआठच्या सुमारास आवराआवर करीत होते. त्यावेळी आरोपींनी पिस्तूल सदृश्य हत्याराचा धाक दाखवून फिर्यादीकडील पाच हजार रुपये काढून घेतले. पोलिसात तक्रार दिली तर बघ, अशी फिर्यादीला धमकी देऊन आरोपी दुचाकीवरून निघून गेले.
दुसऱ्या प्रकरणात विजय त्रिंबक खेडेकर (वय ४९, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे बँकेचे शाखा व्यवस्थापक आहेत. फिर्यादी बुधवारी (दि. १) रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या चारचाकी वाहनातून त्यांच्या सोसायटीच्या गेट समोर आले. त्यावेळी दोन्ही आरोपींनी पिस्तूल सदृश हत्यार दाखवून फिर्यादीकडील एक हजार रुपये, बँकेचे आयकार्ड जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी दगड फेकून मारला. फिर्यादीने तो दगड चुकवला. दगडाने काच फुटून वाहनाचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले.
आरोपी सराईत गुन्हेगारआरोपी अनिकेत उरणकर याच्याविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल आहे. तो सराईत गुन्हेगार असून, फिर्यादी विजय खेडेकर यांच्या तोंडओळखीचा आहे. दोन्ही गुन्हे करताना आरोपींनी सारखीच पद्धत अवलंबली. तसेच त्यांनी वापरलेले वाहन दुचाकी असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन्ही आरोपींचा शोध घेत अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.