पिंपरी : दरोडा टाकणाऱ्या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे कट्टे, सहा राऊंड, एक लोखंडी कोयता, सहा मोबाईल व दोन दुचाकी असा ९७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच व तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे यांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी केली.
निरज भिकमसिंग सेन (वय २१, रा. तळेगा स्टेशन, तळेगाव दाभाडे, मूळ रा. बौरावती, ता. शेहपूर, जि. धौलपूर, राजस्थान), योगेश सोरंग माहोर (२०, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. आरुआ, ता. बाडी, जि. धौलपूर, राजस्थान), सुनील ओमीप्रकाश माहोर (१९, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. मिडाकूर, ता. मलपुरा, जि. आग्रा, उत्तरप्रदेश), श्यामसिंग मुन्नीलाल कोली (३५, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. अरुआ, पो. मरहोलीता, ता. बाडी, जि. धौलपूर, राजस्थान), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधीसंघर्षीत बालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा डोंगराच्या पायथ्याला कमानीजवळ सुदवडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला पाच जण अंधारात संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तीन देशी बनावटीचे कट्टे, सहा राऊंड, एक लोखंडी कोयता, सहा मोबाइल व दोन दुचाकी, असा ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडील दुचाकी व एक मोबाइल माळवाडी ते वराळे रस्त्यावर एका इसमास मारहाण करून चोरी केली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच त्यांच्याकडील दुसरी दुचाकी ही गुन्हा करताना वापरली असल्याचेही सांगितले. दुचाकी चोरीप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज पांडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळी, पंडीत आहिरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.