कामशेत : येथील मुख्य बाजारपेठेतील एक कपड्याचे दुकान आणि दोन किराणा मालाच्या दुकानांचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केली. सकाळी सहा वाजता जैन मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या व्यापारी वर्गाच्या लोकांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार [ दि. २७ ] रोजी रात्री उशिरा च्या सुमारास कामशेत शहरातील रेल्वे स्टेशन जवळील मुख्य बाजारपेठेत तीन दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरांनी चोरी केली. यात पृथ्वीराज मित्तल गदिया यांचे कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटण्यात आले, मात्र आत संरक्षक जाळीचे दुसरे शटर असल्याने चोरीचा प्रयत्न फसला. याच दुकानाच्या शेजारी असलेल्या विनीत दिलीप गदिया यांचे किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील सुमारे दोन हजारांच्या चिल्लर व काही किराणा वस्तूंची चोरी झाली. तसेच दुकानाच्या बाजूला असलेल्या दिलीप बन्सीलाल ओसवाल यांच्या दुकानातून तीन ते चार हजार रुपयांची चिल्लर आणि काही किराणा वस्तूंची चोरी झाली. सकाळी सहाच्या सुमारास चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून घटनास्थळी कामशेत पोलीस अधिकारी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.
दरम्यान रोज रात्री ठराविक वेळी वीज जाते आणि पहाटे ठराविक वेळी परत येते. या प्रकारा विषयी व्यापारी व कामशेतकर नागरिकांकडून शाशंका निर्माण होत आहे. शिवाय मार्च महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली होती. त्यानंतर शहरातील प्रमुख ठिकाणी लावण्यात आलेल्या व बंद अवस्थेत असलेल्या पाच सीसीटीव्ही कॅमेरा पैकी तीन तत्काळ सुरु करण्यात आले होते. कामशेत मध्ये वाढत्या चोऱ्या रोखण्यात व चोरांना पकडण्यात कामशेत पोलीस फेल ठरत असल्याने व्यापारी वर्गासह स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच दुकानाचे शटर उचकटून चोरी किरकोळ होते मात्र त्या उचकटलेल्या शटरच्या दुरुस्तीला मोठा खर्च येत आहे. कामशेत मध्ये वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता या चोरांना पोलीस प्रशासन कधी पकडणार असा प्रश्न व्यापारी असोसिअशनचे अध्यक्ष विलास भटेवरा यांनी उपस्थित केला आहे.