लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडू नयेत याकरिता मागील तीन वर्षापासून नानाविध प्रयत्न सुरु असताना आज सकाळच्या सुमारास खंडाळा घाटातील खोपोली हद्दीत किमी 36/400 येथे दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. एका कंटेनरच्या तोंडासमोर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही दरड पडली.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तीन वर्षापुर्वी खंडाळा घाटात दरड कोसळण्याच्या घटनेत काही जीव गेले होते. यानंतर यामार्गाची सुरक्षितता ध्यानात घेत इटालियन कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत घाट क्षेत्रातील डोंगरभागाला जाळी लावण्यात आली होती. याकरिता कित्येक करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत. काल सायंकाळपासून आज सकाळपर्यत लोणावळा व खंडाळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने खोपोली हद्दीत पुणे लेनवर सदर दरड कोसळली. घटनेची माहिती समजताच आयआरबी कंपनीच्या यंत्रांच्या सहाय्याने सदर दरड बाजुला करण्यात आली आहे.