ज्ञानेश्वर भंडारे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: भाजपचा विचार स्विकारून त्यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटामध्ये मला टार्गेट करण्याची रणनिती ठरविण्यात आली आहे. हे त्यांच्यातील काहींकडूनच मला समजले. त्यासाठी माझ्यावर आरोप केले जात असून अजितदादांपूर्वी मीच भाजपसोबत जाण्यास आग्रही असल्याचे वक्तव्य हास्यास्पद आहे, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली.
चिंचवड येथे शनिवारी (दि.२३) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी (शरद पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे, काशिनाथ जगताप आदी उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, जिथे आहे आणि जी भूमिका घेतली. तिथून भाजप विरुद्ध खूप बोलत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्या गटाने रोहित पवारांना टार्गेट करायचे, अशी रणनिती ठरवली. पण, गेलेल्या सर्वांनी आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात. माझ्यावर टीका करताना विचार करून करावी.
अजितदादांवर भाजपचा छोटा नेता बोलतो. तेव्हा हे सगळे गप्प बसतात. परंतु, माझ्यावर टीका करताना यांच्या उड्या पडतात. त्यांना भाजपला खूश करायचे आहे. सुनील शेळके यांचे आरोप हास्यास्पद आहेत. तर, राम शिंदे यांनी हवेत गोळ्या मारणे कमी केले पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार फोडताना पैशांचे प्रलोभन दाखविल्याचा अंबादास दानवे यांनी म्हटले असेल, तर काही तथ्थ्यावर आधारित ते बोलले असतील. सरकारकडून शाळांचे सुरू असणारे खासगीकरण चुकीचेच असल्याचे पवार म्हणाले.
मलाही ऑफर असू शकते - रोहित पवार
प्रतिगामि विचारासोबत गेलेले नेते विकास निधी देताना ब्लॅकमेल करत असतील, तर ते चुकीचे आहे. यास भपकेबाजी करणारे लोक जबाबदार आहेत. सत्तेसाठी सगळे तिकडे केले असून मलाही त्यांच्यासोबत येण्याची ऑफर असू शकते. परंतु, पुढच्या रांगा सत्तेत गेल्या. त्यांनी दगा दिला. त्यामुळे आम्ही संघर्षाची ही भूमिका घेतली, असेही रोहित पवार म्हणाले.
निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार...
पवार म्हणाले, शिवसेनेच्या फुटीचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देतील. हे शंभर टक्के खरे आहे. त्यानंतर कोर्ट ठाकरे गटाच्या बाजूने लावेल. ही भिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना वारंवार दिल्लीला जावे लागत असून ते शिंदे गटाविरुद्ध निर्णय घेणार नाहीत. न्यायालयाकडूनच निर्णय व्हावा, असा प्रयत्न सुरू असल्याचे पवार म्हणाले.