पिंपरी : लोकसभा निवडणुकीत देशाचे लक्ष बारामतीच्या जागेकडे लागले आहे. या लढतीमुळे पवार कुटुंबातील संघर्ष वाढला असला तरी, तिसरी पिढी मात्र मंगळवारी एकत्र दिसली. हिंजवडीतील बगाड यात्रेत बगाडावर चढताना पार्थ पवारांनीरोहित पवारांना हात दिला. गर्दी असल्यामुळे दोघेही एकमेकांना आधार देत होते. हा व्हिडीओ आणि छायाचित्रे लगेच व्हायरल झाली आणि त्यावरील चर्चेला उकळ्याही फुटल्या.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यातील संघर्ष लोकसभा निवडणुकीत टोकदार झाला आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या आहेत. सगळे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचारात उतरले आहे.मंगळवारी दुपारी अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र यांचे पुत्र आ. रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत चिमटा काढताना म्हटले होते की, मागील वेळी माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला होता, पण पार्थचे वडील अजित पवार स्वतः बारणे यांचा अर्ज दाखल करायला आले होते. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर स्वतःचे बरेच काही पचवायचे असल्याने ते बारणे यांचा प्रचार करत आहेत. मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळला आलो आहे.
त्यानंतर सायंकाळी हिंजवडीच्या बगाड यात्रेत मात्र पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र दिसले. बगाडावर चढताना पार्थ यांनी रोहित यांना हात दिला. हा व्हिडीओ आणि छायाचित्रे लगेच व्हायरल झाली आणि त्यावरील चर्चेला उकळ्याही फुटल्या.
राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचा व्हिडीओही लगेच व्हायरल झाला. त्यात ते म्हणतात, ‘‘युवा नेते पार्थ पवार यांनी पुण्यातील बगाड यात्रेदरम्यान रोहित पवारांना हात देत जवळ घेतले व दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राचे दर्शन घडवले. रोहित पवारांना माझे सांगणे आहे की, तुमचे भविष्य पार्थ पवारांच्या हाती सुरक्षित आहे!’’
हसत साधला संवाद
या कुटुंबातील नात्यांचे बंध अद्याप मजबूत असल्याचेही हिंजवडीत पार्थ पवार आणि रोहित पवारांच्या भेटीत पाहायला मिळाले. यावेळी बगडावर गर्दी जास्त असल्यामुळे दोघांनी एकमेकांना आधार दिला. दोघांनी हसत संवादही साधल्यानंतर चर्चेला उकळ्या फुटल्या.