पिंपरी : शहरातील सर्व रूफटॉप हॉटेल अनधिकृत असल्याचा दृष्टांत पिंपरी-चिंचवड महापालिकेला मागील सहा महिन्यांत झाला होता. त्यानंतर रूफटॉप हॉटेल्सवर सरसकट कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने हाती घेतले. मात्र, हाॅटेल मालक व अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर ते काही नियम व अटी टाकून अधिकृत करण्यात आले होते. त्यामध्ये ४३ रूफटॉप हॉटेल्सना ‘अधिकृत’चे दाखले महापालिकेने दिले होते. मात्र, महापालिकेने घालून दिलेल्या अटी व शर्ती न पाळताच रूफटॉप हॉटेल्स बिनबोभाट सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाइन रोड, भोसरी या भागांत मोठ्या संख्येने रूफटॉप हॉटेल्स तयार झाली आहेत. इमारतीच्या टेरेसवर हॉटेल्स चालवले जातात. या हॉटेल्समध्ये ड्रिंक्स, जेवण अशा सर्व गोष्टी मिळतात. हॉटेल्समध्ये मोठ-मोठे किचन आहेत. मात्र, हे सर्व करताना एकाही हॉटेल मालकाने रूफटॉप हॉटेल्ससाठी परवानगी घेतलेली नव्हती. कोणाकडेही बांधकाम परवाना नाही, अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला नाही. दरम्यान, मुंबईत आग लागल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला होता. मात्र, काही दिवसांनी परस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात ४८ रूफटॉप हॉटेल्स असल्याचे निदर्शनात आले होते. त्यानुसार अग्निशमन विभागाने या हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर काही हॉटेल बंद करण्यात आले. मात्र, काहींनी नोटिशीला उत्तर दिले नाही. त्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा सर्वेक्षण केले. त्यात २१ अनधिकृत रूफटॉप हॉटेल्स आढळून आली होती.
शहरात एकही अधिकृत रूफटॉप हॉटेल नाही. मात्र, काहींनी टेरेसवर ग्राहकांना बसण्याची परवानगी घेतली आहे. ही परवानगी घेतानाही त्यांची बैठक व्यवस्था व बांधकाम असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक हॉटेलचालकांनी टेरेसवर जास्त ग्राहकांना बसता यावे, यासाठी परवानगी व्यतिरिक्त बैठक व्यवस्था व तेथील सुविधा वाढवल्या आहेत. अशी हॉटेल्स अधिकृत असली, तरी नियमांची अंमलबजावणी न केल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. - शेखर सिंह, आयुक्त महापालिका