पिंपरी : दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कोंबिंग ऑपरेशन, प्रतिबंधात्मक कारवाई करून शुक्रवारी शहरात ‘रुट मार्च’ काढण्यात आला.सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्यांच्या समर्थनार्थ व विरोधात देशभर आंदोलन करण्यात येत आहेत. दिल्ली येथील या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात काही जणांचा बळी गेला. त्यामुळे या हिंसाचाराचे व्हिडीओ तसेच प्रक्षोभक ‘पोस्ट’ सोशल मीडियावरून व्हायरल व फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील शांततेस बाधा निर्माण होऊ शकते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी शांतता राखण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत.पिंपरी पोलिसांकडून गुुरवारी (दि. २७) कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली. परिमंडळ एकच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खराळवाडी, पिंपरी कॅम्प, भाटनगर, मिलिंद नगर, दापोडी आदी ठिकाणी पोलिसांचा ‘रुट मार्च’ झाला. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आदी रुट मार्चमध्ये सहभागी झाले होते.भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑ परेशन तसेच प्रतिबंधात्मक कारवाई झाली. यात पोलिसांनी नऊ आरोपींवर कारवाई केली. तसेच कासारवाडी व दापोडी परिसरात ‘रुट मार्च’ काढण्यात आला. पोलीस बंदोबस्तात वाढसोशल मीडियावरून अफवा पसरविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दी तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच संवेदनशील भागातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड : अफवांवर विश्वास न ठेवता शहरातील नागरिकांनी शांतता राखावी, तसेच कायद्याचे पालन करावे. संशयास्पद काही आढळल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा.
पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचा ‘रुट मार्च’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 8:50 PM