मोशी : मोशी चौकात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे नागरिक व वाहनचालक वैतागले आहेत. मोशी टोलनाक्यापासून वाहतूककोंडीला सुरुवात होते. जय गणेश साम्राज्य चौक, देहू रस्ता चौकात हमखास वाहतूककोंडी होताना दिसून येते. येथील भागातील सततच्या वाहतूककोंडीने नागरिक पुरते हैराण आहेत. भोसरी ते खेड असा नित्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. येथील सिग्नल नावालाच बसविले की काय, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहेत. देहूरोड चौकाबरोबरच जुना जकात नाका चौक व मोशी शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर असलेला आयआरबी टोलनाका ही वाहतूककोंडीची हमखास ठिकाणे बनली आहेत. वाहतूक प्रशासनाकडून सिग्नल बसवण्यात आले आहेत. परंतु त्यांचे पालन होत नसल्यामुळे मोशी येथील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी नित्याचीच आहे. याबाबत पोलीस प्रशासन ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही. केवळ प्रत्येक चौकात एक ते दोन पोलीस कर्मचारी व वॉर्डनच्या भरवशावर वाहतूक नियंत्रित करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यामुळे येथील स्थानिक तरुण वार्डनच्या कार्यवाहीला जुमानत नाहीत. तसेच बहुसंख्य वेळी गावातील नागरिक वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून वाहतूककोंडी सोडवताना दिसत आहेत.या भागात विद्यालय, हॉस्पिटल असल्यामुळे या कोंडीचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना व रुग्णाच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. टोल नाक्यावर अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे टोल भरण्यासाठी वाहनांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा तासन्तास लागून राहतात. एकंदरीतच मोशी येथील वाहतूक प्रश्न गंभीर बनत चालला असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
मोशी चौकात वाहतूककोंडी नित्याची
By admin | Published: May 13, 2016 12:59 AM