पिंपरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सोमवारी सकाळी विविध शुल्क भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. कर्मचारी कमी असल्याने शुल्क भरण्याच्या कामासाठी उशिरा सुरुवात झाल्याने नागरिक संतप्त झाले होते. मात्र, शुक्रवारी सोडत झालेल्या क्रमांकाचे डिमांड ड्राफ्टद्वारे शुल्क भरण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्याशिवाय नवीन कोणतीही नोंदणी स्वीकारली जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन वाहनांचे नोंदणी शुल्क, परराज्यातून आलेल्या वाहनांचे शुल्क यांसारख्या कामासाठी आरटीओ कार्यालयातील रोखपाल विभागात नागरिकांची कायम गर्दी असते. कार्यालय सकाळी ९.४५ला उघडते. १०पर्यंत कामकाज सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, सोमवारी सकाळी १२ वाजेपर्यंत नोंदणी शुल्क भरणे सुरूच झाले नाही. शुल्क भरण्याच्या खिडकीबाहेर नागरिकांची मोठी रांग लागली होती. एक महिला कर्मचारी हाताने पावत्या बनवत होत्या. संगणकीय कामकाज बंद होते. एक रोखपाल गैरहजर असल्याने कामकाज सुरू होत नाही. आरटीओकडे कर्मचारीवर्ग कमी आहेत, असे आरोप नागरिकांनी केले. दरम्यान अनेक जणांना हेलपाटा पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)
आरटीओमध्ये लागल्या रांगा
By admin | Published: August 18, 2015 3:36 AM