जाधववाडी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील नो पार्किंग जागेत गाड्या उभ्या केल्या जात असल्याने येथील सेवारस्ता वाहतुकीसाठी आहे की अनधिकृत पार्किंगसाठी, असा नागरिकांना प्रश्न पडत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या कार्यालयांपैकी एक म्हणून आरटीओ कार्यालय ओळखले जाते. या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्याही जास्त असते. मात्र, कार्यालयात येणारे लोक सर्रासपणे आपली वाहने नो पार्किंगमध्येच उभी करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या परिवहन कार्यालयाच्या बाहेर एजंटने ठिय्या मांडलेला असतो. नो पार्किंगचा फलक असताना त्याकडे दुर्लक्ष करून या सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एजंटच्या गाड्या उभ्या केलेल्या असतात. कार्यालयासमोरून नव्याने बांधलेला बीआरटी रस्ता जातो. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे बीआरटी बस सुरू होण्यास दिरंगाई झाली आहे. या बीआरटी मार्गिकेमध्येच अनेक अवजड वाहने उभी केली जातात. शिवाय, या मार्गिकेवरील बीआरटी बसथांब्यांचीही दुर्दशा झाली आहे. या कार्यालयाच्या समोर मोठ्या कंपनीचे गेट आहे. या गेटमधून दिवसभर गाड्यांची ये-जा सुरू असते. या कंपनीत येणारी अवजड वाहने अनेक वेळा रस्त्याच्या कडेला, तसेच बीआरटी मार्गिकेत उभी केली जातात. केएसबी चौकातील उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्यावर अनेक वेळा वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. वाहनचालकांना पक्का परवाना देण्यासाठी घेण्यात येणारी चाचणीदेखील या इमारतीच्या पार्किंगमध्ये घेतली जात होती. अपुऱ्या जागेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने इंद्रायणीनगरमध्ये नवीन ट्रॅक बांधला असून, त्या ठिकाणी चाचणी घेतली जाते. वाहतुकीचे नियमन करणाऱ्या परिवहन कार्यालयासमोरच नियमांचा भंग होत असताना प्रशासन गप्प का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. (वार्ताहर)
स्वतंत्र पार्किंगची गरज ४सुरुवातीस निगडी प्राधिकरण परिसरात असणारे हे परिवहन कार्यालय जागेअभावी चिंचवड येथील शाहूनगर परिसरात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, या ठिकाणीदेखील कार्यालयाला जागा अपुरी पडत आहे. दिवसेंदिवस या कार्यालयाचा व्याप वाढत असल्याने सध्याची जागादेखील अपुरी पडत आहे. ४या इमारतीच्या तळाला पार्किंगची सोय आहे. मात्र, या ठिकाणी फक्त परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच गाडी लावण्यास मुभा आहे. त्यामुळे या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांना आपली वाहने रहदारीच्या रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. प्रशासनाने इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहने उभी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.