पिंपरी : पाऊस सुरू असताना, गणेशोत्सवाच्या तोंडावर कासारवाडी भागात स्मार्ट सिटीची रस्ते खोदाई सुरू केली आहे. उन्हाळ्यात रस्ते खोदाई न करताना सणांच्या तोंडावर खोदाई सुरू केल्यानंतर संतप्त झालेल्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या बोर्डाला शाई फासली.
पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीच्या कामांसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. तसेच कासारवाडी परिसरात रस्ते खोदाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले होते. पावसाळा आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ते खोदाई करू नये, गणेशोत्सवानंतर नियोजन करावे, अशी मागणी कासारवाडी, फुगेवाडीतील नागरिकांनी नगरसेविका आशा शेंडगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी सह शहर अभियंता अशोक भालकर आणि आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन नागरिकांच्या भावना पोहोचविल्या होत्या.
त्यानंतर काम थांबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतरही आजपासून काम सुरू केले. याबाबत भालकर यांच्याशी दूरध्वनी करून संवाद साधला. त्यावेळी ‘काम थांबणार नाही, असे भालकर यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या महिलांसह नगरसेविका शेंडगे यांनी महापालिका भवन गाठले. पहिल्या मजल्यावरील भालकर यांच्या दालनात गेल्या. मात्र, भालकर उपस्थित नसल्याने चौथ्या मजल्यावरील आयुक्त दालनात पोहोचल्या. महिलांनी ठिय्या मांडला. महिलांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी महिलांनी आयुक्तांच्या बोर्डावर शाई फेकली. गोंधळ झाल्याने आयुक्त बाहेर आले. त्यावेळी महिला आंदोलन करीत होत्या. त्यानंतर आयुक्त तिथून निघून गेले. त्यानंतर पोलीस दाखल झाले. त्यांनी नगरसेविका शेंडगेसह महिलांना ताब्यात घेतले आहे.