पिंपरी : शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सर्वसाधारण सभेत साडेसहा तास चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ प्रशासनावर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांपैकी काही नगरसेवकांनी ‘...कालचा गोंधळ बरा होता’ अशी उपरोधिक टीका केली. निष्क्रिय प्रशासनावर कारवाई होण्यापेक्षा निष्कर्षविना चर्चा पाण्यात गेली. सत्ताधाºयांनी प्रशासनास अभय दिल्याची टीका होत आहे.महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. चर्चेची सुरुवात शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी केली. त्यांनी अशुद्ध पाण्याची बाटली भेट देत प्रशासनाचा निषेध केला. ‘‘लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे,’’ अशी टीका सुजाता पालांडे यांनीही केली. ‘धरणात मुबलक पाणीसाठा असताना पाणी मुरते कुठे,’ अशी विचारणा राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांनी केली. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणीपट्टी, कर भरू नये, असे आवाहन शिवसेनेचे सचिन भोसले यांनी केले. ‘नागरिकांचा संयम सुटला, तर ते हातात दंडुका घेऊन मागे लागतील, अशी टीका राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांनी केली. ‘आमदार, पालकमंत्र्यांचे पाणीपुरवठ्यावर लक्ष नाही. प्रशासन देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. फक्त मोठ्या निविदांमध्ये रिंग करणे, त्यांचे बैठका घेणे यामध्येच प्रशासन व्यस्त आहे, अशी टीका माजी महापौर योगेश बहल यांनी केली. ‘लोकांना पाणी देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्याची खंत वाटते. पाणीप्रश्न न सुटल्यास आयुक्त दालनात आंदोलन करू, असा घरचा आहेर तुषार कामठे यांनी दिला. माजी महापौर नितीन काळजे यांनी, शहरात पन्नास टक्के अनधिकृत नळजोड असून, प्रशासनाला याचे गंभीर्य नाही. मुबलक पाणीपुरवठ्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची सूचना केली. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘आयुक्तांना कोणतेही व्हीजन नाही. त्यांनी एकही चांगले काम केले नाही. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ महासभा तहकूब करावी.’’ माजी महापौर मंगला कदम यांनी, रावेतसारखे आणखी एक पंपिंग स्टेशन उभारण्याची मागणी केली. ‘‘दिघी परिसरात पाणीबाणी सुरू असून पाणीपुरवठा सुरळीत करू न शकणाºया अधिकाºयांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवक विकास डोळस यांनी केली.या चर्चेत नगरसेविका सुलक्षणा धर, अनुराधा गोफणे, स्वाती काटे, वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, पौर्णिमा सोनवणे, आरती चोंधे, नीता पाडाळे, उषा ढोरे, झामाबाई बारणे, मीनल यादव, संगीता ताम्हाणे, आशा शेंडगे, सुनीता तापकीर, स्वाती काटे, शैलजा मोरे, प्रियंका बारसे, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, नामदेव ढाके, राजेंद्र लांडगे, चंद्रकांत नखाते, सचिन चिखले, संदीप कस्पटे, संदीप वाघेरे, अंबरनाथ कांबळे, प्रमोद कुटे, हर्षल ढोरे, बाळासाहेब ओव्हाळ यांनी सहभाग घेतला.‘अधिकारी उंटाहून शेळ्या हाकत असल्याची टीका नामदेव ढाके यांनी केली. राजा व्यापारी आणि प्रजा भिकारी झाली आहे. आजची परिस्थिती पाहिल्यास कालचा गोंधळ बरा होता, अशी टीका संदीप वाघेरे यांनी केली. ‘कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक हैराण आहेत, अशी टीका मयूर कलाटे यांनी केली. भाजपाच्या सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘मार्च, एप्रिल महिन्यात विस्कळीत होणारा पाणीपुरवठा आत्ताच कसा विस्कळीत झाला. ही परिस्थिती निर्माण केली आहे का, याचा शोध घ्यावा.’’शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, की शहरातील पाणी पुरवठ्याचा आयुक्तांनी अभ्यास केला नाही. मनाला आले की पाणी पुरवठ्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली जाते. नदीच्या अलीकडून आणि पलीकडून फोन आला, की आयुक्त निर्णय बदलतात.’’सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘आठ दिवसांच्या आत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास संबंधित अधिकाºयाचे निलंबन करण्यात यावे. अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.’’ तहकुबीची सूचना मांडल्यानंतर नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले.>शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाने तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा. आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. आजची महासभा ३१ आॅक्टोबर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे.- राहुल जाधव, महापौरपाणी पुरवठ्याचे नियोजन शून्य आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचेदेखील आम्ही नियोजन केले होते. परंतु, सत्तांतर झाल्यानंतर त्या योजना रखडल्या आहेत. जोपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत सभा चालू दिली जाणार नाही.- दत्ता साने, विरोधी पक्षनेते
सत्ताधारी म्हणतात, कालचा गोंधळ बरा होता!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 1:50 AM