रहाटणी : मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात फिरून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे, त्यामुळे रहाटणीकरांवर कोणी पाणी देता का पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. कमी दाबाने व अपुरा तसेच वेळी अवेळी पाणीपुरवठा केला जात असल्याने येथील नागरिक रात्र जागून काढीत आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना इतरत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दररोज नको, मात्र एक दिवसाआड का होईना; पण पाण्याचा मुबलक पुरवठा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.रहाटणी, काळेवाडी परिसरात प्रामुख्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या परिसरात भाडेकरुंची संख्या लक्षणीय असल्याने अनेकांकडे पाणी साठविण्यासाठी म्हणावी तशी व्यवस्था नसल्याने अनेकांची पंचाईत होत आहे. राज्यातील नव्हे तर राज्याबाहेरील ग्रामीण भागातील अनेक कुटुंब शहरात कामाच्या निमित्ताने आले आहेत. भाड्याने घर घेऊन वास्तव्य करीत आहेत. मात्र, अनेक कुटुंबाकडे पाणी साठविण्यासाठी कोणतीच साधने नसल्याने पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिक, महिला बिगारीकाम करतात तर काही महिला घरकाम करतात. यासाठी सर्वांनाच लवकर कामावर जावे लागते़ मात्र, सध्या पाण्यासाठी रात्र जागवावी लागत असल्याने काहीवेळा कामावर खाडे करून घरी थांबवावे लागत आहे.महात्मा फुले कॉलनी, सिद्धार्थनगर, सायली पार्क १, २, रामनगर, रहाटणी गावठाण या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत तर रात्री आठनंतर असा उशिरा पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागांत तर रात्री साडेनऊ नंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना रात्र जागविण्याची वेळ येत आहे. मागील काही दिवसांपासून रामनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र, भाडेकरू पाणी साठविणार कशात हा प्रश्न आहे. रहाटणी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत़ त्या बांधकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरले जात आहे. त्यासाठी अनेक मिळकतधारक मोटारीने पाणी घेत आहेत़ ज्या नागरिकांकडे मोटार नाही त्यांना पाणी मिळतच नाही़ त्यामुळे अशा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (वार्ताहर)
रहाटणीकरांच्या तोंडचे पळाले पाणी
By admin | Published: April 27, 2017 5:05 AM