पिंपरी : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. आळंदी रोड, दिघी येथे विठ्ठल मंदिराजवळ गुरूवार दुपारी हा अपघात झाला. वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला.
राम बाळासाहेब बागल (वय २४) असे मृत्यू झालेल्या नाव आहे. किशोर राजेंद्र बागल (रा. दिघी), सुरज जगन्नाथ घुले (वय २६, रा. बोपखेल), सुमित कालिदास परांडे (वय २८, रा. दिघी गावठाण), टेम्पो चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई बाबाजी जाधव यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम आणि किशोर हे चुलत भाऊ आहेत. दोघेजण बुलेट दुचाकीवरून जात होते. किशोर बुलेट चालवत होता. त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बुलेट विरुद्ध दिशेने नेली. रस्त्यात विरुद्ध दिशेला सुरज आणि सुमित यांनी त्यांची कार पार्क केली होती. त्यांनी कारचा डाव्या बाजूचा दरवाजा उघडला असता बुलेटची दरवाजाला धडक बसली. या धडकेत बुलेटवर मागच्या सीटवर बसलेला राम खाली पडला. त्यावेळी विरुद्ध दिशेने एक टेम्पो येत होता. त्या टेम्पोखाली आल्याने राम बागल याचा मृत्यू झाला.