पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन भरलेले उमेदवारीअर्ज प्रत्यक्षात निवडणूक कार्यालयात सादर करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. उमेदवारीची उत्सुकता आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. शेवटच्या दिवशी अधिक अर्ज आल्याने निवडणुकीचे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गाची तारांबळ उडाली होती. महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. उमेदवारीअर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी तीनपर्यंत उमेदवारीअर्ज आणि एबी फॉर्म सादर करण्याची मुदत होती. प्रथमच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकाही राजकीय पक्षाने आपली अधिकृत उमेदवारयादी जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले, तरी एबी फॉर्म वाटण्यात गुप्तता पाळण्यात येत होती. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यापासून ते संबंधित पक्षाचा एबी फॉर्म सादर करण्यापर्यंतची जबाबदारी कार्यकर्त्यांची होती. निवडणुकीसाठी शिवसेनेने सव्वाशे उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म दिले आहेत. अधिकृत उमेदवारीयादी जाहीर केली नसली, तरी यादी निश्चित केली असून, एबी फॉर्म देऊन शिवसेनेने आघाडी घेतली आहे. उरलेल्या उमेदवारांना दुपारी एकपर्यंत एबी फॉर्म दिले. सकाळपासूनच शहरातील ११ निवडणूक कार्यालयांत उमेदवारीअर्ज सादर करण्यासाठी गर्दी झाली होती. जसजशी उमेदवारीअर्ज सादर करण्याची मुदत संपण्याची वेळ जवळ आली, तसतशी गर्दीही वाढू लागली. काही उमेदवार दुचाकी, चारचाकी फेरी घेऊन निवडणूक कार्यालयात येत होते. तर काही जण चमकोगिरी करण्यासाठी सायकल, मोटार सायकलवरून येत होते. उमेदवारांचे कार्यकर्ते आणि निवडणूक कर्मचारी यांच्यात वाद सुरू होता. आॅनलाइन अर्जासाठी गर्दी होती. (प्रतिनिधी)बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाने तिकीट नाकारले, तर इच्छुक लगेच दुसऱ्या पक्षात उड्या मारतात. त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादी, भाजप यांनी एबी फॉर्म वाटले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप या दोन्ही पक्षांनी दक्षता घेतल्याचे दिसून आले. काही अधिकृत एबी फॉर्म वाटले नसून, उमेदवारांची यादी थेट आयुक्तांकडे दिली. काँग्रेसनेही काही उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षांनी अद्याप एकाही उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच धाकधूक वाढली होती.
उमेदवारीअर्ज भरण्यासाठी धावपळ
By admin | Published: February 04, 2017 4:09 AM