काळेवाडी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरात सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत एकत्र उठत-बसत असलेल्या उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांची फळी तयार करुन गटागटाने मतदारांच्या भेटीगाठीवर व कोपरा सभेवर भर दिला आहे. प्रत्येक उमेदवाराने मी निवडून येणारच या आविर्भावात निवडणूक लढवण्याची तयारी चालवलेली आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची त्यांची धावपळ सुरू आहे. अनेक प्रबळ इच्छुक उमेदवारांना पक्षाकडील एबी फॉर्मची आतुरता लागलेली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांना यंदा आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. त्यामुळे अर्ज भरतानाही तो अचूक भरण्यासाठी योग्य त्या संगणक आॅपरेटरची व माहीतगाराची शोधाशोध सुरू आहे. आॅनलाइन अर्ज भरताना अर्ज रिकामा ठेवू नका. ज्या ठिकाणी पर्यायाचे उत्तर नसेल, त्या ठिकाणी रेष ओढा. मात्र, ती जागा रिक्त ठेवू नका अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत दिल्या आहेत. त्यामुळे फॉर्म उमेदवार माहीतगाराच्याच मदतीने फॉर्म भरण्यासाठी ठाम आहेत.निवडणूक विभागाच्या वतीने मंगळवारी संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आॅनलाइन अर्ज भरण्यासंदर्भात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवारांसाठी कार्यशाळा घेण्यात आली होती. त्या वेळी आॅनलाइन अर्जासंदर्भात योग्य ती माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)सोमवारपासून येणार वेगनिवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने अनेकांनी अर्ज भरणे टाळले. नंतर शासकीय सुट्या आल्याने सोमवारपासूनच अर्ज भरण्यास वेग येणार आहे. उमेदवार आॅनलाइन अर्ज भरून, त्याची प्रिंट काढून, नोटरी करून योग्य ती कागदपत्रे सोबत जोडून तो अर्ज सादर करण्याकामी योग्य माहीतगाराच्या शोधासाठी व इतर माहिती मिळवण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे.
कागदपत्रांसाठी इच्छुकांची धावपळ
By admin | Published: January 29, 2017 4:00 AM