अनिल पवळ ।पिंपरी : वही-पेन संकलन आणि वितरणसारख्या उपक्रमातून गरजूंना शिक्षणाच्या मुख्य धारेत आणण्याचे काम पिंपरी-चिंचवडमधील ‘यूथ व्हीजन आॅर्गनायझेशन’ या संघटनेच्या सदस्यांनी केले आहे.महाविद्यालयीन शिक्षण घेताना काही तरुण-तरुणी ‘एनएसएस’च्या माध्यमातून एकत्र आले. एनएसएसच्या सामाजिक उपक्रमांत ते हिरिरीने सहभागी होत. त्यातून त्यांना सामाजिक कर्तव्याची जाणीव झाली आणि सुरू झाला ‘यूथ व्हीजन’चा प्रवास. शिक्षण संपल्यानंतर सामाजिक कार्याची आवड जोपासता यावी; तसेच कॉलेजमधील मैत्री पुढे टिकवता यावी. म्हणून या युवकांनी एक संघटना स्थापण्याचा निर्णय घेतला. तिचे नाव ठेवले ‘यूथ व्हीजन आॅर्गनायझेशन.’ ‘ध्येय समाजपरिवर्तनाचे’ हे ब्रीद उराशी बाळगून या युवकांनी पथनाट्यातून सामाजिक समस्यांना वाचा फोडली.पथनाट्याबरोबरच समाजातील दानशूर लोकांना एकत्र घेऊन निरंतर चालणारा व उपेक्षितांना हातभार लावणारा उपक्रम सुरू करण्याचे या युवकांनी ठरविले. त्यातूनच ‘वही-पेन संकलन व वितरण’ उपक्रम सुरू करण्यात आला. सोशल साइट्सच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. सदस्यांनी स्वत:च्या हिश्श्यातून ठरावीक रक्कम जमा केली आणि त्यातून सुमारे १०० डझन वह्या एकत्र केल्या, असे अमर चव्हाण, रणजित सफाले, सुनील पाडवी, नवेद मौैलवी, ऐश्वर्या चिंचवडे, ऐश्वर्या आपटे, तेजस्विनी भालेकर, अक्षय बैरागी, हरिश टकले, सहदेव फड यांनी सांगितले.यूथ व्हीजन आॅर्गनायझेशन संघटनेतील सर्व सदस्य उच्चशिक्षित आहेत. संघटनेचे सदस्य दर महिन्याला दोनशे रुपये उपक्र म निधी जमा करतात व यातून शक्य असेल, तसा उपक्रम राबविला जातो. सन २०१३ मध्ये सुरू केलेल्या संघटनेत सुग्रीव बरडे, आप्पा गोफणे, विठ्ठल साठे, शिवांजली मुंगसे, नितीन फड, दीपाली देवकाते, स्रेहल जाधव, दीपाली कुलकर्णी, सायली डाखवे, राहुल वाकळे, श्याम रासकर, सत्यवान तांबे हे हिरिरीने काम करीत आहेत.
सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे ‘यूथ व्हीजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:23 AM