देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील केंद्रीय संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील ऐतिहासिक धम्मभूमी बांधकामास विशेष बाब म्हणून परवानगी मिळणे, विविध सरकारी आस्थापनांकडे थकीत सेवाकराची २१८ कोटी रुपयांची थकबाकी मिळावी, दर वर्षी अनुदान मिळावे, नोकरभरती, तसेच विविध प्रलंबित प्रस्तावांबाबत तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष व बोर्ड सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू यांच्या नेतृत्वाखाली बोर्ड सदस्य व नागरिकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची देहूरोड येथे भेट घेऊन सविस्तर मागण्यांचे निवेदन दिले असून, याबाबत आठवले यांनी सकारात्मक भूमिका घेत संरक्षण मंत्र्यांसमवेत लवकरच दिल्लीत बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.
मारिमुत्तू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे बोर्ड सदस्य गोपाळ तंतरपाळे यांनी निवेदन देऊन चर्चा केली. रेडझोन असल्याने ऐतिहासिक धम्मभूमी बांधकामास परवानगी मिळण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी. बोर्डाचे केंद्रीय संरक्षण आस्थापनांकडून थकीत असलेली सेवाकराची २१८ कोटी रुपयांची थकबाकी तातडीने मिळावी, बोर्डाला दर वर्षी अनुदान मिळावे, बोर्डाच्या अनुकंपा नोकरभरती, २३४ रिक्त जागांवरील भरती, पाणीयोजनेसह शाळा, दवाखाना बांधकाम, भुयारी सांडपाणी व प्रक्रिया योजनेच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी आदी मागण्यांचे निवेदन आठवले यांना देण्यात आले .