तळवडे : लोणावळा परिसरातील चढाई करण्यास अत्यंत अवघड असलेला नागफणी सुळका शिखर फाउंडेशनच्या गिर्यारोहकांनी सर केले.विक्रांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष विवेक तापकीर, प्रवीण पवार, संजय बाठे, जालिंदर वाघोले, नितीन टाव्हरे, शिवाजी आंधळे, सुधीर गायकवाड, भास्कर मोरे, अजिंक्य उनवणे आदी दहा सभासदांनी सहभाग घेतला.नागफणी सुळका सर करण्यासाठी गिर्यारोहकांनी चिंचवड येथून लोणावळ्याच्या दिशेने कूच केली. तेथून कुरवंडे गावातून रात्री ११.३०च्या सुमारास सर्वजण सुळक्याच्या खाली असलेल्या पठारावर पोहोचले. रात्री तेथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी सुळक्यावर चढाई करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी तापकीर यांनी सुरक्षेबाबतच्या सूचना देत बाठे यांच्याकडे चढाईची धुरा सोपविली, या वेळी शिंदे यांनी सुरक्षा दोर सांभळत संजयला साथ दिली. सकाळी साडेनऊच्या सुमारास जय भवानी जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत नागफणीच्या प्रस्तराला भिडला. पहिल्या दोन तासांतच संजयने जवळपास १०० फुटांची अवघड चढण पार केली. संजयच्या चढाईने प्रेरित झालेला विक्रांत फ्री क्लाइविंग करत पहिल्या टप्प्यावर भिडला. जालिंदर वाहिले याने त्याला दोर सांभाळत साथ दिली. तेथून पुढे चढाईसाठी अवघड आणि मधमाशांची पोळी असलेला दुसरा टप्पाही संजय आणि विक्रांतने लीलया पार केला. या कालावधीत जालिंदर पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचला. (वार्ताहर)
नागफणी केली सर
By admin | Published: February 07, 2017 3:02 AM