गणरायासाठी सजली बाजारपेठ, थर्माकोलबंदीमुळे पर्यावरणपूरकवर मंडळांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 02:02 AM2018-09-10T02:02:07+5:302018-09-10T02:02:20+5:30

लाडक्या गणरायाचे अर्थात बाप्पाचे आगमन चार दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरीतील बाजारपेठ सजली

Sajli market for the Ganaraya, the emphasis on the environment through the thermoclocking | गणरायासाठी सजली बाजारपेठ, थर्माकोलबंदीमुळे पर्यावरणपूरकवर मंडळांचा भर

गणरायासाठी सजली बाजारपेठ, थर्माकोलबंदीमुळे पर्यावरणपूरकवर मंडळांचा भर

Next

पिंपरी : लाडक्या गणरायाचे अर्थात बाप्पाचे आगमन चार दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरीतील बाजारपेठ सजली असून मखरे, विविध आकारांतील गणेशमूर्ती खरेदी, विद्युत सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने आज मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. प्लॅस्टिक आणि थर्मोकोल बंदीमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशभक्त भर देत आहेत.
गणेशोत्सवाची वाट वर्षभर पाहत असतात. बाप्पाचा उत्सव गुरूवारपासून सुरू होत आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सजली आहे. बाजारपेठही गणेशमय झाली आहे. विविध आकारांतील आणि विविध रूपांतील बाप्पांच्या मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी आणि दापोडी, आकुर्डी, तळवडे, थेरगाव, दिघी भागात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
मंडप टाकण्याची लगबग
गणेशोत्सव जवळ आल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंडप उभारणीच्या कामात मग्न आहेत. मंडप उभारणीचे काम जोरात सुरू आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरू नये, अशी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्या आवाहनासही मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच पुण्याप्रमाणेच पिंपरीचे हलते आणि जिवंत देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे देखावे काय करायचे याचे नियोजनही मंडळे करीत आहेत. तसेच देखांव्याच्या मूर्ती साकारण्यावर कलावंत अखेरचा हात देत आहेत.
चौरंग, मूषकवाहक रथ, सिंहासन, कमळाच्या आकारातील मखरे,
तसेच विविध झाडे, फुले, कागदी आणि कापडी हार, तोरणही
दाखल झाले आहेत. पर्यावरणरक्षणासाठी मखर, सिंहासनांना मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
>शाडूच्या गणपतींना मागणी
पिंपरी : प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सामाजिक उपक्रमास पूर्णानगर, फुलेनगर, घरकुल या भागातील महिला, विद्यार्थी व नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने शाडूच्या मातीने गणपती बनविल्या. आपल्या घरी शाडूची सुंदर मूर्ती यंदा बसविण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. प्रभाग क्रमांक ११ मधील महात्मा फुलेनगर बॅडमिंटन हॉलमध्ये प्रशिक्षण झाले. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विकास पाटील उपस्थित होते. शाडू मातीचे गणपती बनविण्याचे धडे देण्यात आले. दोनशेहून अधिक शाडू मातीचे गणपती बनविले.
रासायनिक रंगांमुळे नुकसान
आपल्या घरी शाडूची सुंदर मूर्ती यंदा बसविण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘पर्यावरण रक्षणात आपलाही हात लागावा म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली गेली. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनानंतरही कित्येक दिवस पाण्यात विघटित होत नाहीत. रासायनिक रंगामुळे नद्या, तलाव, विहिरीमधील पाणी प्रदूषित होते. याला रोखण्यासाठीच प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीचा जास्तीत वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे घरोघरी शाडू मातीपासून तयार झालेले गणपती स्थापन होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण होईल.’’
रोषणाईवर भर
घरगुती गणेशोत्सव साजरा करताना अत्यंत सोप्या पद्धतीने सजावट करण्यावर भर असतो. त्यामुळे पिंपरीतील बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोट्या दिव्यांच्या माळा, फुले, हिटलॉन शीट, क्रिस्टल माळा, चायनीज माळा दाखल झाल्या आहेत. रोषणाईचे साहित्य खरेदीसही गर्दी झाली होती.
सजावट साहित्य
गणरायांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबच घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येणाºया उत्सवाची तयारी सुरूच आहे. बाप्पांना सजविण्यासाठी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाप्पांचा फेटा, उपरणे, मुकुट, रंगीत खडे, क्रिस्टल्सने बनविलेले दागिनेही यंदाचे प्रमुख आकर्षण आहे.
कागदी मखरे
थर्मोकोल आणि प्लॅस्टिक वापरावर शासनाने बंदी झाली आहे. त्यामुळे कागदी मखरे बाजारात दाखल झाले आहेत. मखरासाठी पडद्यांच्या झालर, गेट कमान, छत आणि झुंबरांना विशेष मागणी आहे. यंदा बाप्पासाठी पडद्यातील फोल्डिंगच्या मखराला अधिक मागणी आहे. तसेच रंगीबेरंगी कापडाच्या माध्यमातूनही सजावटीचा ट्रेण्ड आला आहे.

Web Title: Sajli market for the Ganaraya, the emphasis on the environment through the thermoclocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.