पिंपरी : आकुर्डी सर्कल, खंडोबा माळ येथील अॅडोर वेल्डिंग कंपनीच्या संचालकासह अन्य तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खोट्या विवरणपत्राच्या आधारे शासनाचा कर कमी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. ३ कोटी ४१ लाख ४३ हजार २१७ रुपए मूल्यवर्धीत कर बुडविल्याप्रकरणी शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात पिंपरी पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाचा कोट्यवधी रकमेचा कर बुडविल्याप्रकरणी संजय शेडगे (वय ४५, रा. धनकवडी) यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अॅडोर कंपनीचे संचालक सतिश भट, मुख्य वित्त अधिकारी गिरीष पाटकर, प्रकल्प प्रमुख उल्हास पुजारी, वरिष्ठ अधिकारी राजेंद्रनाथ अशी त्यांची नावे आहेत. या आरोपींनी खोटी विवरणपत्र तसेच खोटी टॅक्स इन्व्हाईस जोडून विक्रीकर देयता कमी दाखवली. त्यावरील १५ टक्के दराने मिळणारे वार्षिक व्याज बुडविण्याचा प्रयत्न केला. कंपनीशी व्यवहार झालेल्या व्यापाऱ्यांची खरेदी विक्रीची बिले तपासली. वाहन भाडे पावत्या तपासल्या. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे जाब जबाब घेतले. खर्चाच्या हिशोबाच्या वह्या, व्यक्तीगत डायऱ्या, इनवर्ड, आऊटवर्ड रजिस्टर, खरेदी विक्री बिले आदी व्यवसायाशी संबंधित दस्त आढळून आले. यातील आरोपींनी करबुडविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शासनाच्या महसूल उत्पन्नास हानी पोहोचवली आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेतील कलमाच्या आधारे बनावट कागदपत्र सादर करणे, फसवणूक करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मूल्यवर्धीत कायदा २००० नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
कर बुडविण्याच्या हेतूने आकुर्डीत साडेतीन कोटींची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 2:56 PM
आकुर्डी सर्कल, खंडोबा माळ येथील अॅडोर वेल्डिंग कंपनीच्या संचालकासह अन्य तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खोट्या विवरणपत्राच्या आधारे शासनाचा कर कमी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देपिंपरी पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखलआरोपींनी करबुडविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शासनाच्या महसूल उत्पन्नास पोहोचवली हानी