पिंपरी : अधिकृत मॅन्युफॅक्चरिंग नसतानाही चहा पावडर बनवून ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरला. तो चहा आणि अन्य आठ प्रकारची उत्पादने विक्री करून फसवणूक केली. रहाटणी येथे ११ सप्टेंबर २०२१ रोजी हा प्रकार उघडकीस आला. सचिन रमेश गोसावी (वय ४०, रा. खार, मुंबई) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
प्रतापराम ताजाराम चौधरी (वय २८, रा. रामनगर, रहाटणी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीत नोकरी करतात. आरोपीने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड नावाचे अधिकृत मॅन्युफॅक्चरिंग नसलेले परंतु हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाचा बनावट लोगो वापरून तयार केलेला रेड लेबल चहा पावडर माल आणि इतर आठ प्रकारची उत्पादने ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुकानात ठेवली.
आरोपीकडे ७० हजार ४४२ रुपयांचा बनावट मुद्देमाल आढळून आला. आरोपीने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले. याबाबत हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.