पिंपरी : सेल्स मॅनेजरनेच कंपनीची ६३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बबन श्रीधर चव्हाण (रा. फ्लॅट नं. १३, ओम कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी राजेंद्र पंढरीनाथ सोनवणे (वय ४६, रा. गंगानगर, प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चव्हाण हा सोनवणे यांच्या अॅचिव्ह हायड्रॉलिक्स अॅन्ड न्युमॅटिक्स प्रा. लि. कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर कामाला होता. त्या वेळी कंपनीने तयार केलेले हायड्रॉलिक सिलिंडर, हायड्रॉलिक पॉवर पॅक, प्रेस मशिन, न्युमॅटिक सिलिंडर यांचे मार्केटिंग व नवीन आॅर्डर घेण्याचे काम करीत असताना त्याला कंपनीने नवीन मशिन व हायड्रॉलिक सिस्टिमचे डिझाईन अॅडव्हर्टायझिंगसाठी विश्वासाने चव्हाण याच्याकडे दिले. त्या वेळी त्याने इंडिया मार्ट, जस्ट डायल, माहाटेक इंडस्ट्री अॅन्ड डिरेक्टरी, ट्रेड एक्सेल आदी कंपनीला पेमेंट देणे आहे, असे सांगून २०१३ ते मे २०१८ या कालावधीत कंपनीकडून वीस लाख रुपये घेतले. ती रक्कम मार्केटिंगसाठी इंडिया मार्ट, जस्ट डायल, माहाटेक इंडस्ट्री अॅन्ड डिरेक्टरी यांना न देता चव्हाण याने स्वत:कडेच ठेवली.
तसेच कंपनीद्वारे तयार केलेल्या हायड्रॉलिक सिस्टीमची इतर कंपनीला विक्री करुन त्याचे २७ लाख १० हजार ९९६ रुपये कंपनीस परत न करता फसवणूक केली. यासह कंपनीच्या मार्केटिंगसाठी प्रवास व इतर खर्चाचे खोटे कारण सांगून कंपनीमध्ये खोटी बिले, कागदपत्रे बनविली. तसेच २०१३ ते २०१८ या कालावधीत कंपनीकडे इतर लहान-मोठ्या कंपन्यांच्या ग्राहकांचे येणे असलेल्या रकमा कायमस्वरूपी बुडीत असल्याचे सांगून १६ लाख रुपये स्वत:कडे ठेवून घेतले. अशी सर्व मिळून ६३ लाख १० हजार ९९६ रुपयांची रक्कम कंपनीस परत न करता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरुन फसवणूक केली.