पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक सहा येथील गृहप्रकल्पामधील सदनिकांच्या विक्री किमतीस प्राधिकरण सभेत मंजुरी देण्यात आली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्यासह प्राधिकरणाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पेठ क्रमांक सहामध्ये गृहयोजना क्रमांक १ अंतर्गत २ बीएचके या प्रकारच्या १२४ सदनिका बांधण्यात येणार आहेत. यामध्ये एका सदनिकेचे क्षेत्रफळ (सुपर बिल्ट अप एरिया) ७८९. ९७ चौरस फूट ते ८९५.१३ चौरस फुटांपर्यंत आहे. त्याची विक्री किंमत क्षेत्रफळानुसार ३९ लाख ४९ हजार ते ४४ लाख ७५ हजारांपर्यंत आहे. यामध्ये स्टँप ड्युटी, रजिस्ट्रेशन, जीएसटी यांचा खर्च वेगळा आहे. तसेच गृहयोजना क्रमांक दोन अंतर्गत १ बीएचके प्रकारच्या २६० सदनिका बांधण्यात येणार आहेत. यामध्ये एका सदनिकेचे क्षेत्रफळ ५०२.७८ चौरस फूट आहे. व त्याची विक्री किंमत १७ लाख ५० हजार असेल. यामध्ये स्टँप ड्युटी, रजिस्ट्रेशन, जीएसटी यांचा खर्च वेगळा आहे.
एकही गृहयोजना महापालिकेच्या घरकुल योजना अथवा झोपडपट्टी पुनवर्सन प्रकाराप्रमाणे नाही. या योजना केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रास्तावित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांचे काम तातडीने सुरू होणार आहे.- सदाशिव खाडे, अध्यक्ष, प्राधिकरण.