जाधववाडी : दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वांत उंच माउंट किलीमांजरो या पर्वतावर शिवजयंती साजरी करीत सह्याद्रीच्या मावळ्यांनी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील सुधीर दुधाणे आणि सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.‘लिंगाणा’ हा तब्बल १००० फूट उंचीचा पर्वत त्यांनी अवघ्या २२ मिनिटांत चढून आणि २३ मिनिटांमध्ये उतरण्याचा विक्रम केला आहे. या धाडसी मोहिमेदरम्यानचे अनुभव या गिर्यारोहकांनी सांगितले आहे. या मोहिमेदरम्यान खुभ हट ते तासनिया पॉईंटची चढाई अत्यंत कठीण होती. हाडे गोठवणारी थंडी आणि अतिवेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे या चढाईमध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे ड्रोन उडवणे जोखमीचे होते. शिवाय फोटो काढणेदेखील शक्य नव्हते. बोचणारे वारे आणि कापऱ्या थंडीला मात देत या मावळ्यांनी खुभ हटच्या पायथ्याशी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ड्रोन उडवून शूटदेखील करण्यात आले. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने झेंडा बाहेर काढणे कठीण झाले होते. मात्र तरीही शिखरमाथ्यावर भगवा फडकवत गारद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर खुभ हटच्या पायथ्याशी मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात आली. गिर्यारोहकांची या धाडसी मोहिमेला बंगळूरच्या माउंटिंग क्लबचे नीरज माळवे आणि कीर्ती ओसवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिवरायांच्या पुतळ्यास पर्वतावर अभिषेकदक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वांत उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस फार कमी गिर्यारोहकांनी दाखवले आहे. हा पर्वत सर करण्याची धाडसी मोहीम फत्ते करत सह्याद्रीच्या या मावळ्यांनी शिवजयंतीला या पर्वतावर छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.