पिंपरी : मावळलोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या वतीने माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बुधवारी १६ उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात मावळमधील वाघेरे यांचा समावेश आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाचा निम्मा भाग पुणे जिल्ह्यात तर निम्मा भाग रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारीचे घोंगडे भिजत पडले होते. मात्र, महाविकास आघाडीने वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे समर्थक चिंतेत आहेत. संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर म्हणून त्यांनी काम केले. तीन महिन्यापूर्वी ते शिवसेना ठाकरे गटात सामील झाले होते. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.
कोण आहेत संजोग वाघेरे
पिंपरीत वाघेरे कुटुंबास राजकीय पार्श्वभूमी आहे. दिवंगत महापौर भिकू वाघेरे यांचे संजोग वाघेरे हे चिरंजीव आहेत. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या स्थायी समितीच्या सभापती होत्या. संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर म्हणून त्यांनी काम केले. मावळची जागा ही शिवसेनेची आहे. ३० डिसेंबर २०२३ ला राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केले होता.