पिंपरी :मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. निवडणूक काळात प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवारांना स्वत:साठी तसेच कुटुंबीयांसाठी वेळ देता आला नाही. त्यांचा दिनक्रम बदलला होता. मात्र, मतदानानंतर मंगळवारी उमेदवार निश्चिंत झाल्याचे दिसून आले. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन उमेदवारांमध्ये लढत झाल्याचे दिसून येते. या उमेदवारांनी मतदानानंतर कार्यकर्ते, जवळच्या लोकांना आणि कुटुंबीयांना वेळ दिला.
संजोग वाघेरे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
प्रचारात गेल्या साडेचार महिन्यांपासून गुंतून राहिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मतदानानंतरचा दिवस अर्थात मंगळवार कुटुंबीयांसोबत घालवला. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाचा ३७ वा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर मंगळवारी शुभेच्छांचा वर्षाव झाला. वाघेरे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये (उद्धवसेनेत प्रवेश केला, तेव्हापासून प्रचाराला सुरुवात केली. त्यासाठी सकाळी लवकर घराबाहेर पडून रात्री उशिरापर्यंत प्रचार करत होते. सोमवारी मतदानाच्या दिवशी पहाटेपासूनच त्यांच्या दिवसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते आणि मतदारांसोबत होते. वाघेरे यांचा दिवस एरवी सकाळी साडेसहाला सुरू होतो. निवडणूक काळात त्यात बदल झाला. तर मंगळवारी एक तास उशिराने सकाळी साडेसातला त्यांचा दिवस सुरू झाला.
सकाळी पिंपरीगावातील काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेतले. तेव्हापासून त्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली. घरी अनेक जण आले. त्यांच्याशी गप्पांमध्ये वाघेरे पाटील रममाण झाले. वाघेरे यांची पत्नी उषा आणि मुलगा ऋषिकेश यांनीही निवडणूक काळात प्रचारात झोकून दिले होते. त्यांनाही वेळ दिला. वाघेरे पाटील म्हणाले, प्रचारामुळे दररोज धावपळ व्हायची. मात्र, आज निवांत आहे. प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून अनेकांनी निवडणुकीबाबत चर्चा करून लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुपारनंतर कुटुंबाला वेळ दिला. कुटुंबातील चिमुरड्यांसोबत गंमत-जंमत केली.
आप्पांकडून नातवाचे लाड
शिंदेसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचा दिवस सकाळी आठ वाजेपासून सुरू होतो. त्यांच्या कार्यालयात ते आठ वाजता येतात. कार्यकर्ते, नागरिक यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतात. तसेच चार अधिवेशनांसाठी वर्षातील पाच महिन्यांचा कालावधी दिल्लीत जातो. उर्वरित दिवसांमध्ये कार्यालयात तसेच इतर कार्यक्रम, समारंभ यासाठी वेळ जातो. पक्षाच्या कामासाठीही वेळ द्यावा लागतो. मात्र, निवडणूक काळात या दिनक्रमात मोठा बदल झाला. या काळात सकाळी सात वाजेलाच दिवस सुरू व्हायचा. प्रचार, रॅली, सभा, मेळावे यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. मतदानाच्या दिवशी दिवसभर मतदान केंद्रांवर फिरून तसेच आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून रात्री उशिरापर्यंत कामकाज करावे लागले. मतदानानंतरच्या दिवशी मंगळवारी आप्पांचा दिवस सकाळी आठला सुरू झाला. आठ वाजेपासून ते कार्यालयात होते.
कार्यकर्ते, परिसरातील काही नागरिकांनी भेट देऊन निवडणुकीबाबत चर्चा केली. मतदान कुठे, कसे, किती प्रमाणात झाले, याबाबत कार्यकर्ते आणि आपल्या जवळच्या लोकांशी बोलणे झाले. दुपारी अडीच वाजेला कार्यालयातून बाहेर पडून ते घरी गेले. दुपारनंतर आप्पा यांनी अडीच वर्षांचा लाडका नातू राजवीर याच्यासोबत वेळ घालवला. निवडणूक काळात त्याला वेळ देता आला नसल्याने त्यांनी नातवाचे कोडकौतुक करून लाड पुरवले. आप्पा म्हणाले, आज कुटुंबीयांसोबत वेळ देणार आहे. तसेच, बुधवारपासून मुंबई येथे प्रचारासाठी जाणार आहे.