अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 08:54 AM2023-12-27T08:54:23+5:302023-12-27T08:58:33+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता त्यांच्या बालेकिल्ल्यातच पहिला झटका बसला आहे.
Ajit Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता त्यांच्या बालेकिल्ल्यातच पहिला झटका बसला आहे. पवार यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहरातील नेते संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडाली. संजोग वाघेरे पाटील अजितदादांचा गट नेमका का सोडणार आहेत याचे कारण समोर आले आहे, वाघेरे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यामागचे कारण सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान
"मी काल उद्धव ठाकरे यांची भेटल घेतली. ही माझी सदिच्छा भेट होती. माझी अपेक्षा आमदार किंवा खासदार होण्याची आहे, मी २०१४ पासून खासदारकीचा प्रयत्न केला. तेव्हापासून मी तिकीट मागत होतो. यावेळी मी मावळ मतदार संघातून निवडणुका लढवावी अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. आता मी अजितदादांच्या सोबत असल्याने मावळ मतदारसंघ आता शिंदे साहेबांना सुटल्यामुळे मी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. यावेळी मी त्यांच्याजवळ उमेदवारीची मागणी केली. आता मी मतदारसंघात कार्यकर्त्यांशी बोलणार असून पुढचा निर्णय घेणार आहे, असं स्पष्टच संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.
वाघेरे पाटील म्हणाले, मला अजितदादांकडून निरोप आला तर मी त्यांची भेट घेईन. ते माझे नेते आहेत.माझी पक्षातील कोणावरही तक्रार नाही, मला लोकसभा लढायची आहे. यासाठी मी पक्ष सोडत आहे, असंही वाघेरे पाटील म्हणाले.
माजी महापौर संजोग वाघेरे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहेत. अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले संजोग वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतरही संजोग वाघेरे पाटील यांनी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे वेळोवेळी जाहीर कार्यक्रमांतून सांगितले.