डॉ. रवींद्र घागुर्डे म्हणाले, ‘‘मराठी संगीत रंगभूमीनं महाराष्ट्राला स्वरांचं अक्षरश: वेड लावलं. दिग्गज कलाकारांनी ती रंगभूमी घडवली, फुलवली, सजवली आणि नाट्यवेड्या संगीतप्रेमींच्या जीवनाला बहर आला. अनेक वर्षांचा संगीत रंगभूमीचा हा प्रवास काही काळ थोडासा मंदही झाला. अशाचवेळी भारतीय संगीतातल्या वैशिष्ट्यपूर्ण घराणे परंपरेचा विषय हाताळून, सर्वांगाने म्हणजे कथानक, ओघवती भाषा, संगीत, सेट्स, अभिनय अगदी सर्व बाजूंनी देखणं असं एक नाटक रसिकांच्या काळजातच घुसलं.संगीत नाटकांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. अशाच परंपरेतील संगीत नाटकाचा यंदा सुवर्णमहोत्सव आहे. ‘लागी करेजवा कटार’ या ठुमरीमुळे जन्माला आलेलं, पुरुषोत्तम दारव्हेकरांचं ‘कट्यार काळजात घुसली!’ स्वर, शब्द, अभिनयाचा त्रिवेणी संगमच! या नाटकानं रसिकांना आनंद तर दिलाच; पण त्याशिवायही संगीताचा प्रवास करणाऱ्या गुरु-शिष्यांना विचार दिले. अंतर्मुखही केलं.२४ डिसेंबर १९६७ या दिवशी दुपारी ४ ला डॉ. भालेराव नाट्यगृह, साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे या नाटकासाठी खास बनवलेल्या, तीन फिरत्या रंगमंचावर ‘नाट्यसंपदेने’ पहिला प्रयोग सादर केला. ‘ललित कलादर्श’ या संस्थेच्या हीरकमहोत्सवासाठी नाट्यसंपदेनं ‘कट्यारचा’ नजराणाच दिला.वेगळ्या कथानकांमध्ये संगीतातल्या या विषयावर किंवा गायकीवर त्यापूर्वीही नाटकं झाली होती. मग कट्यारमध्ये विशेष काय होतं? की आज ४९ वर्षे होऊनही ती हवीहवीशी वाटते. या नाटकांत संगीत आणि साहित्य सतत हातात घालूनच जातं. म्हणूनच बंदिशींना जितकी दाद मिळते तितकीच संवादानांही. संगीताचा धर्म स्वरांचा, भाषा सुरेलपणाची, स्वरांवरच्या मायेची, बुुजुर्गांच्या आणि त्यांच्या ज्ञानाबद्दलच्या आदराची, समर्पणाची. इथे कुठलीही भाषा, धर्म, जात, रंग आड येत नाही.’’‘‘गाणं जुनं असो नाही तर नवं. मनाच्या गाभाऱ्यात गुंजायला लागलं की ते कुणासमोर तरी मांडावं, दाद मिळावी, आशीर्वाद घ्यावा असं वाटतं अन् ‘गाते रहो’ असं कुणी म्हटलं की कसलेच मोह उरत नाहीत. मग कसली पदकं नकोत, ना पद! लोकांच्या हृदयातलं स्थान अत्युच्च ठरतं. प्रत्येक कलाकाराचे हे अंतिम आणि एकमेव लक्ष्य असते.पंडित जितेंद्र अभिषेकींच्या अभ्यासपूर्ण संगीतामुळे दोन घराण्यांच्या गायकीतला फरक सामान्य श्रोताही जाणू शकतो आणि माणसाचा गळा, मेंदू आणि हृदयामध्ये का? याचं उत्तर ते संगीतच देतं. पंडित वसंतराव देशपांडे यांनी खाँसाहेब आफताब हुसेन या भूमिकेला आपल्या अलौकिक गायन प्रतिभेने जिवंत केलं, आणि मराठी संगीत रंगभूमीवर आपल्या गायन-अभिनयाचा मानदंड प्रस्थापित केला. ‘कट्यार’ने नाट्यरसिक महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांचे स्वरपोषण केले. गेली ४९ वर्षे ही ‘कट्यार’ काळजात घुसतेच आहे. रसिकानां मोहिनी घालते आहे.भारतीय शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने ज्यांनी ‘नवे सूर अन् नवे तराणे’ असे नव पर्व सुरू केले, त्या मा. दीनानाथ मंगेशकर आणि डॉ. वसंतराव देशपांडे या थोर गायकांच्या शिष्य परंपरेतील ‘नादब्रह्म परिवार’ या संस्थेतर्फे १०० हून अधिक सुविहित प्रयोग सादर केले. रंगमंचावर आलेल्या या बहारदार नाटकाला आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. शास्त्रीय संगीत चळवळ वाढीस लावण्यासाठी सरकार, संस्थांनी बळ द्यायला हवे. महापालिका असो किंवा राज्याचे कलाधोरण ठरविताना दूरदृष्टी असणाऱ्या कलावंतांचा, अभ्यासकांच्या सूचनांचा विचार करायला हवा. त्या सूचनांच्या आधारे चांगली आणि परिणामकारक धोरणे राबविणे सरकारला शक्य होऊ शकते. संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा जिवंत ठेवण्याचे काम नादब्रह्म परिवाराकडून सुरू आहे. संगीत नाटक ही जिवंत कला असून जिवंत कला माणसांच्या मनावर संस्कार करीत असते. ही परंपरा टिकून रहावी, जुनी गाजलेली संगीत नाटके जतन करण्याची गरज आहे. यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. संस्थांना अर्थिक बळ देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा घांगुर्डे यांनी व्यक्त केली.शास्त्रीय संगीत चळवळ वाढीस लावण्यासाठी सरकार व सामाजिक संस्थांनी बळ द्यायला हवे. महापालिका किंवा राज्याचे कलाधोरण ठरविताना दूरदृष्टी असणाऱ्या कलावंतांचा, अभ्यासकांच्या सूचनांचा समावेश असायला हवा, त्यातून चांगली आणि परिणामकारक धोरणे राबविणे सरकारला शक्य होऊ शकते. संगीत नाटक ही जिवंत कला असून जिवंत कला माणसांच्या मनावर संस्कार करीत असते. ही परंपरा टिकून रहावी, जुनी गाजलेली संगीत नाटके जतन करण्याची गरज आहे. यासाठी प्रयत्न प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरीयल फाउंडेशनचे अध्यक्ष, प्रसिद्ध गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी सांगितले़
संगीत नाटकांतून जीवनावर संस्कार
By admin | Published: May 05, 2017 1:48 AM