पिंपरी : हरिनामाचा गजर करत संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी प्रस्थान झाले. तीर्थक्षेत्र देहू येथे पालखीसोबत १०० पोलिसांचे सुरक्षा कडे आहे. पालखीला पोलिसांच्या या सुरक्षा कड्यामुळे चोऱ्यामाऱ्यांच्या प्रकारांना आळा बसला. वारकऱ्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली.
संत तुकोबारायांचा पालखी सोहळा शुक्रवारी देहू येथील इनामदार वाड्याकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी शासकीय महापूजेवेळी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, बापू बांगर, डाॅ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त देविदास घेवारे, बाळासाहेब कोपनर यांच्यासह पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक देखील पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
पालखीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. दर्शन घेण्याच्या घाईत अनेकांना आपल्या मोबाइल, रोखरक्कम, दागिन्यांचे भान राहत नाही. याचाच फायदा घेऊन चोरटे अलगद दागिने, मोबाइल, रोखरक्कम चोरून नेतात. त्यामुळे गेल्यावर्षीपासून पालखीला देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. यंदा देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे या कॅमेऱ्यांच्यामाध्यमातून सातत्याने सुरक्षेचा आढावा घेत आहेत. तसेच सुरक्षा कवचमध्ये समावेश असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील सूचना करीत आहेत.
देहू येथून पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर दुसरा मुक्काम आकुर्डी येथे असतो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होते. दरम्यान दापोडी येथे हॅरिस पुलापर्यंत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची हद्द आहे. त्यामुळे दापोडीपर्यंत पिंपरी-चिंचवड पोलिसांचे हे सुरक्षा कवच राहणार आहे. तेथून पुढे पुणे शहर पोलिसांचे सुरक्षा कवच कार्यरत होणार आहे.
...असे आहे तुकोबांच्या पालखीचे सुरक्षा कवच
सहायक पोलिस आयुक्त - ३पोलिस निरीक्षक - ४सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक - १४पोलिस अंमलदार - ४०एसआरपीएफ - एक तुकडी (२५ जवान)दंगल नियंत्रण पथक - एक तुकडी (२५ जवान)