देहूरोड : संत तुकाराम महाराजांचा परतीचा पालखी सोहळा रविवारी सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड कॅन्टोनमेंट हद्दीत दाखल झाला. लष्करी हद्दीतून महामार्गावर वारकरी हरिनामाचा गजर करीत दुपारी सव्वाबारा वाजता देहूरोड येथील वीरस्थळासमोरील संत तुकाराममहाराज स्वागत कमानीजवळ पोहचला. चिंचोली, किवळे ,रावेत, विकासनगर, किन्हई , गहुंजे, सांगवडे व मामुर्डीसह मावळातील विविध गावांतील भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
देहूरोड लष्करी भागात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पालखीतील पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले. चिंचोलीत शनि व पादुका मंदिर येथील विसाव्याच्या ठिकाणी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरती झाल्यांनतर पालखी सोहळा विसाव्यासाठी वीस मिनिटे थांबला होता. यावेळी पंचक्रोशीतील व विविध दिंड्यातील भाविकांनी व ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. चिंचोलीत विसाव्याच्या परिसरात संत तुकाराम अन्नदान मंडळासह विविध संघटना व व्यक्तींकडून खिचडी व फराळ वाटप करण्यात आला .
पुणे जिल्ह्यातील विविध गावातील दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पालखी सोहळा दाखल होण्यापूर्वीच येऊन चिंचोली व शनिमंदिर परिसरात थांबल्या होत्या. विसाव्याच्या ठिकाणी देहू- देहूरोड परिसरातील विविध संघटना, मंडळे तसेच व्यक्तींनी वारकर्यांसाठी फराळाची व्यवस्था केली होती. चिंचोलीत विश्रांती घेऊन सोहळा दुपारी एकच्या सुमारास देहूकडे मार्गस्थ झाला.