भंडारा डोंगर (पुणे) : संत तुकाराम महाराज यांचे अभंग जीवनास प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात. जगण्याची दिशा देतात, असे मत वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य, हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी येथे वसंत पंचमीच्या दिवशी व्यक्त केले. श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी मनोहर भेगडे यांच्या हस्ते पांडुरंगाला अभिषेक करण्यात आला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, ह.भ.प. नाना महाराज तावरे, विजय जगताप, पंकज महाराज गावडे, शिवानंद स्वामी, ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद उपस्थित होते.
विविध राज्यातून वारकरी दाखल
गाथा पारायण सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागातून, तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून आले आहेत. मोठे माऊली यांची जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या 'धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी, तेथे उपकारासाठी, आले देव ज्या वैकुंठी, ' या अभंगावर कीर्तन सेवा झाली.आज पहाटेची काकडा आरती, अभिषेक, महापूजा संपन्न झाल्यानंतर गाथा पारायण झाले. सायंकाळी ४ ते ६ या कालावधीमध्ये हभप रविदास महाराज शिरसाठ यांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्रावार तत्व चिंतनपर निरुपण झाले.
गावाच्या भाकरी डोंगरवर
पश्चिम दिशेला मंदिराच्या मागील बाजूला ‘संत तुकाराम महाराज महा प्रसादालय’ असा भव्य मंडप उभारला असून सकाळच्या न्याहरीपासून ते रात्री १० वाजेपर्यत या मंडपात अखंडपणे अन्नदान सुरु आहे. महेंद्र होनावळे हे महाप्रसाद तयार करीत आहेत. मावळ, खेड, मुळशी या तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ मंडळी गावाच्या भाकरी डोंगरवर आणून देत आहेत.
चाकण, शेल पिंपळगाव, मोशी, तळेगाव येथील भाजीपाला विक्रेत्यांकडून मोफत भाजीपाला व भंडारा डोंगर पंचक्रोशीतील दुध व्यवसायीकांकडून मोफत दुध उपलब्ध होत आहे. मावळ तालुक्याच्या पश्चिम टोकाला असणा-या बोरीवली व खांडी गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी परंपरेप्रमाणे महाप्रसाद वाटपाची सेवा करीत आहेत. चिखली येथील प्रदीप नेवाळे यांनी मंडप व्यवस्था केली आहे. मंदिराच्या अलीकडेच पाचशे मीटर अंतरावर भाविकांच्या दुचाकी व चार चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली असून तळेगाव एम.आय.डी.सी. नवलाख उंबरे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.