पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल यांची काँग्रेसने उपेक्षा तर भाजपने कैवार केला. पंडीत जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले म्हणून नेहरू युग, नेहरूंचा ठसा देशावर उमटला. तो स्वाभाविक होता. परंतु सरदार पटेलांची उपेक्षा ही बरोबर नाही. नेहरू आणि सरदार पटेल या महापुरुषांना समसमान भूमिकेतून पाहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पंकज पाटील आणि संदीप तापकीर लिखित ‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ या संशोधित ग्रंथाचे नवी सांगवी येथे प्रकाशन झाले. यावेळी सबनीस बोलत होते.
डॉ. सबनीस म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेस पक्षाचे होते तरीही ते विरोधी पक्षाचे, लोहशाही वादी पक्षाचे होते. ते सहिष्णुता बाळगणारे होते. उजव्या- डाव्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांना गुंतवून ठेवण्याचे कारण नाही. ते खरे राष्ट्रभक्त होते. गांधी, नेहरू आणि सरदार पटेलांचा त्रिकोण लक्षात घेतला तर डावीकडे झुकलेले नेहरू आणि उजवीकडे झुकलेले पटेल असे म्हंटले जाते. तरी ते परस्पर विरोधी नव्हे तर त्यांच्या या भूमिका परस्पर पुरक होत्या. त्यामुळे पंतप्रधान नेहरू आणि उपपंतप्रधान सरदार पटेल यांचे काम इतिहासामध्ये एकमेकांना पुरक ठरले. ‘नेहरू प्लस सरदार पटेल इज इक्वल टू गांधी’ आणि ‘गांधी इज इक्वल टू इंडिया’ हे सूत्र इतिहासात अधोरेखीत झाले.