भोसरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये विश्वासात घेतले जात नसल्याने, तसेच सन्मानकारक वागणूक मिळत नसल्याने माजी आमदार विलास लांडे गटाची बैठक भोसरीतील लांडेवाडी येथे बैठक झाली. पक्षनेतृत्वाने यात लक्ष घालून काही नेत्यांची मनमानी मोडीत काढावी, तसेच महापौर आणि पक्षनेतेपदी अन्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्याचे पक्षनेतृत्वाकडे तक्रार करणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.निवडणुकीच्या तोंडावर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहराध्यक्ष, शहर कार्यकारिणीतील बदल, वॉर्ड अध्यक्ष, विविध समित्यांच्या निवडी सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष, महिला शहराध्यक्ष बदल झाला. मात्र, अन्य समित्यांची निवड झालेली नाही. राष्ट्रवादीतील धुसफूस आणि गटबाजी अजूनही शांत झालेली नाही. पक्षात सन्मानकारक वागणूक मिळत नसल्याने नाराज लांडे गटाने बंडाचे निशाण फडकाविले आहे. या संदर्भात भोसरीतील लांडेवाडीत बैठक झाली. या वेळी माजी महापौर मोहिनी लांडे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक संजय वाबळे, आशा सुपे, विनया तापकीर, तानाजी खाडे, शुभांगी बोऱ्हाडे, शशिकिरण गवळी, विश्वनाथ लांडे, समीर मासूळकर, अनुराधा गोफणे, साधना जाधव, स्वाती साने, मंदा आल्हाट, विजय लोखंडे, धनंजय भालेकर, सदस्य निवृत्ती शिंदे, भरत लांडगे, सुरेखा गव्हाणे, संदीप नेवाळे, नीलेश नेवाळे, प्रभाकर ताम्हणे यांच्यासह भोसरी विधानसभा परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
महापौर बदलासाठी सरसावला लांडे गट
By admin | Published: March 10, 2016 12:43 AM