वाकड : मारुंजीच्या सरपंच प्राची बुचडे यांच्याविरुद्ध मुळशी तहसीलदारांकडे नऊ सदस्यांनी अविश्वास ठरावाचा अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जानुसार शनिवारी (दि. ३१) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होईल. त्यात मतदान घेण्यात येईल. त्यावरून अविश्वास ठराव मंजूर करणे किंवा रद्द करणे ठरेल. या विशेष सभेबाबत सर्व सदस्यांना नोटीस काढण्यात आल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.ग्रामपंचायतीचा वाढता भ्रष्टाचार, कामातील अनियमितता, वारंवार ग्रामसभा, मासिक सभा तहकूब करण्यामुळे गावचा विकास खुंटला आहे. गावाच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष, काम करताना सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, अधिकाराचा दुरुपयोग होत असून, ग्रामपंचायत निधीचा अपव्यय होत आहे इत्यादी कारणे नऊ सदस्यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या अविश्वास ठराव अर्जात नमूद केली आहेत. अविश्वास ठराव अर्जावर कृष्णा बुचडे, आकाश बुचडे, विकास जगताप, संजय बुचडे, गणपत जगताप, पूनम बुचडे, बायडाबाई बुचडे, विमल लांडे, संदीप जाधव सदस्यांनी सही केली आहे. (वार्ताहर)
अविश्वास ठरावावर शनिवारी सुनावणी
By admin | Published: December 29, 2016 3:18 AM