पिंपरी : ‘आपल्याकडे का बघतो,’ या किरकोळ कारणावरून एका तरुणावर पाच जणांनी मिळून कोयत्याने वार करत, सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १९) पिंपळे गुरव येथे घडली. या प्रकरणी मयूर चंद्रकांत शिंदे (वय २२, रा.देहू रोड) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी रिहान आरिफ शेख (१९, रा.पिंपळे गुरव) याला अटक केली असून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टी स्टॉलवर थांबले होते. तेव्हा एका संशयित आरोपीसोबत ‘आपल्याकडे का बघतो,’ या कारणावरून वाद झाला. त्यावेळी इतर संशयित आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने वार केला, तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे.