पिंपरी : कुणबी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढविणारे नितीन काळजे यांचा कुणबी जातीचा दाखला रद्द ठरला. त्यामुळे त्यांचे महापौरपद व नगरसेवक पद धोक्यात आले आहे. कुणबी दाखल्यावर निवडणूक लढलेल्या महापौरांचे पद धोक्यात आल्याने अशाच पद्धतीने कुणबी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढलेल्या अन्य नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका निवडणुकीत कुणबी जातीच्या दाखल्यावर एकूण २२ जण निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यातील १२ नगरसेवक कुणबीच्या दाखल्याच्या आधारे नगरसेवक झाले आहेत. यातील बहुतांशी नगरसेवक, नगरसेविका यापूर्वीची निवडणूक खुल्या वर्गातून लढले होते. या वेळी प्रभागात आरक्षण पडल्याने त्यांनी ओबीसी (इतर मागास वर्ग) गटातून उमदेवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढली. ही निवडणूक लढताना, खरे कुणबी विरूद्ध खोटे कुणबी अशी लढत झाली. कुणबीचे दाखले मिळवून ओबीसीच्या जागेवर निवडणूक लढलेल्यांनी खऱ्या ओबीसींवर अन्याय केला असल्याची ओरड निवडणूक काळात ओबीसी संघटनांच्य पदाधिकाऱ्यांकडून झाली. खऱ्या कुणबींनाच उमेदवारी द्यावी, अशीही मागणी ओबीसी संघटनेने केली होती. परंतु, त्याची राजकीय पक्षाने फारसी दखल कोणी घेतली नाही. राजकीय पक्षांनीही खरे कुणबी, दाखला मिळवून झालेले कुणबी याची खातरजमा न करता, निवडणुकीत उमेदवारी दिली. महापौरपदाचे आरक्षण इतर मागास वर्गासाठी होते.(प्रतिनिधी)खऱ्या कुणबीला न्याय देण्याची मागणी महापालिकेत भाजपाची सत्ता आहे़ खऱ्या कुणबींवर अन्याय होणार नाही, याची दक्षता पक्षाने घ्यावी, अन्यथा खऱ्या कुणबींच्या हिताच्या रक्षणासाठी लढा उभारावा लागेल, असा इशारा ओबीसी आरक्षण बचाव संघटनेने दिला आहे.
कुणबी दाखलेवाल्यांचे दणाणले धाबे
By admin | Published: April 30, 2017 5:11 AM