पुणे : एफटीआयआयमधील २००८च्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी संचालकांवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचा दबाव अधिकच वाढल्यामुळे मूल्यमापन होणारच, अशी ताठर भूमिका संचालकांनी घेतल्याने एफटीआयआयच्या ‘महाभारता’त सोमवारी रणकंदन माजले. ‘होणार-नाही होणार’ अशा आक्रमक भूमिकांवरून संचालक-विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. संचालकांच्या हटवादी भूमिकेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला, तरीही संचालक आपल्या निर्णयावर ठामच राहिले. २००८ च्या बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे त्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करणे योग्य नाही, अशी ताठर भूमिका प्राध्यापकांनीच घेतल्यामुळे मूल्यमापनाची प्रक्रिया थांबण्यात आली होती. ही एक राजकीय खेळी असून, दोन महिने चाललेले हे आंदोलन दडपून टाकण्याचा हा प्रकार असल्याचे स्टूंडंट असोसिएशनसह २००८च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. यासंदर्भात संचालक प्रशांत पाठराबे, अधिष्ठाता (फिल्म्स), कुलसचिव, स्टुडंट असोसिएशन प्रतिनिधी आणि २००८ बॅचचे विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत प्राध्यापकांनी मूल्यमापन प्रक्रिया सुरू करण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र संचालक पाठराबे मूल्यमापन प्रक्रिया पार पाडण्याच्या भूमिकेवरच ठाम राहिले. शुक्रवारीदेखील त्यांनी प्राध्यपकांना विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पाचे मूल्यमापन करण्यास सांगितले. मात्र प्राध्यापकांनी नकार दर्शविला. त्यानंतर पुन्हा संयुक्तपणे झालेल्या बैठकीत मूल्यमापन प्रक्रियेला स्थगिती देण्याचा तोडगा काढण्यात आला.यासंदर्भात सोमवारी अंतिम निर्णय घेतला जाणार होता, मात्र अचानक संचालक प्रशांत पाठराबे यांनी नोटिशीद्वारे प्राध्यपकांना अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करण्याचे फर्मान सोडले, मात्र प्राध्यापकांनी मुल्यमापन करणार नाहीच पवित्रा घेतला. दुपारपासून संचालक-विद्यार्थ्यांमध्ये मूल्यमापन प्रक्रियेवरून खडाजंगी सुरू झाली. संचालक आपल्या भूमिकेवर ठाम होते, पण जोपर्यंत यावर कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत संचालकांच्या केबिनमधून बाहेर पडणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. रात्री उशीरापर्यंत ही धुमश्चक्री सुरूच होती, असे विद्यार्थ्यांकडून समजते. (प्रतिनिधी)
मूल्यमापन प्रक्रियेवरुन खडाजंगी
By admin | Published: August 18, 2015 3:34 AM