पिंपरी : चिंचवड आनंदनगर झोपडपट्टी ही सुमारे पंधरा हजार नागरीकांची वस्ती. तिथे सुमारे साडेचार हजार झोपड्या आणि घरे आहेत. वीजबीले थकीत असल्याने या भागातील फीडर आणि टद्बान्सफार्मर विज मंडळाने बंद केले होते. महिनाभरापासून वीज प्रश्न रखडला होता. मात्र, रविवारी शाळकरी मुले रस्त्यांवर आली, अभ्यास सुरू केला. त्यानंतर दुपारनंतर वीजेचे दोन फीडर सुरू केले आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे चिंचवड, आनंदनगर झोपडपट्टी आहे. वीजबीले थकीत असल्याने महावितरणने फीडर बंद करून वीजजोड तोडले होते. ही कारवाई करताना नियमित वीजबीले भरणाऱ्यांची वीज खंडीत झाली होती. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले होते. वीज मंडळ आणि नागरिक चर्चा सुरू असतानाच महिनाभर येथील वीज खंडीत झाली होती. त्यातच परीक्षांचा कालखंड असल्याने मुलांची गैरसोय होत होती. त्यामुळे महावितरणच्या विरोधात नागरिक कृती समितीतर्फे उपोषणाचा इशारा दिला. त्यानुसार आज सकाळी दहापासून आंदोलन सुरू झाले. यामध्ये शाळकरी मुले पाटी, दप्तर, वह्या, पेन आदी साहित्य घेऊन आंदोलनात आले आणि अभ्यास करून निषेध करू लागले. आंदोलनात माजी नगरसेवक काळूराम पवार, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, तानाजी खाडे यांच्यासह मोठयाप्रमाणावर पालक आणि मुले आंदोलनात सहभागी झाली. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत झालेल्या आंदोलनामुळे महावितरणचे अधिकारीही आंदोलनस्थळी आले. त्यानंतर चर्चा करून दोन फीडर सुरू केले. त्यानंतर नियमित वीज बीले भरणाऱ्यांना नागरिकांचे वीजजोड सुरू करून दिले आहेत.
अशी आहे मागणी
याभागात सामान्य, कष्टकरी नागरिक वास्तव्यास आहेत. जुणी बीले अधिक वाढल्याने, थकीत बीलांमुळे वीज मंडळाने वीजजोड तोडले आहेत. ते पूर्ववत करावेत, अशी मागणी नागरिकांची आहे. तसेच जुणी बीले माफ करावीत, नवीन जोड द्यावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, थकीत बील भरल्याशिवाय वीजजोड देता येत नाही. किंवा नवीन वीजजोड देता येत नाही. त्यामुळे थकीत बीले भरल्यानंतरच वीज जोड देऊ. वीज बीले माफीबाबत वरीष्ठ निर्णय घेतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तसेच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान फीडर सुरू करून नियमित बील भरणाऱ्या नागरिकांचे वीज पुरवठा पूर्ववत केला आहे.