वडगाव मावळ : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये पालकांना विश्वासात न घेता विद्यार्थ्यांची शालेय फी ही दुप्पट केली. संस्थेने वाढविलेली फीचा निषेध नोंदविण्यासाठी संतप्त पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ही वाढवलेली फी रद्द न केल्यास एकही विद्यार्थाला शाळेत न पाठविण्याचा इशारा देत सुमारे तीनशे पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे धाव घेतली.
रयत शिक्षण संस्थेचे वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये पालकांना विश्वासात न घेताच ८ हजार ४०० रुपये असलेली फी दुप्पट करत १५ हजार केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या घटनेचा निषेध केला. मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी मंगला वाव्हाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. गोरगरीब कुटुंबांतील आमची मुले-मुली वडगाव येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये नर्सरी ते सहावीपर्यंत शिक्षण घेत आहे. परिस्थिती नसताना आम्ही १० हजार डोनेशन भरून मुलांना प्रवेश घेतला. त्यांची वार्षिक फी ८ हजार ४०० होती दरवर्षी पाचटक्के वाढविली जाईल असे सांगितले होते. परंतु, पालकांना विश्वासात न घेता दुप्पट फी वाढ केली आहे. तसेच पालकांनी ही फी १० तारखेपर्यंत भरली नाही तर शाळेत बसू देणार नाही असे सांगण्यात आले होते.
यावेळी महिला पालक रोहिणी चव्हाण, स्वाती मोहिरे, कल्याणी गरूड, संगिता महाजन, भारती म्हाळसकर, सुषमा बागडे, शितल विर, बिना विश्वकर्मा आदीसह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...................
चौकशी करून कारवाईयाप्रकरणी गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ म्हणाल्या, शिक्षण विभागाने पालक यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही फी वाढ करता येत नाही. चौकशी संस्थेवर कारवाई करण्यात येईल.मुख्याध्यापक शंकरराव दुबल म्हणाले , इंग्लिश स्कूलची स्थापनेपासून फी वाढ केलेली नाही . सीबीएसई बोर्डाची मान्यता पुर्ततेसाठी फी वाढ करण्यात आली आहे.