तळेगाव दाभाडे : इंदोरी जवळील पिंजणमळा येथील अमराईच्या संरक्षण तारेमध्ये सोडलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसून एका शाळकरी मुलीचा करुण अंत झाला.पिंकी बापू केदारी (वय ११ रा.इंदोरी ,ठाकरवस्ती)असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आदिवासी ठाकर समाजातील मुलीचा असा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री इंदोरी परिसरात वादळी पाऊस पडला. अमराईच्या कुंपणाजवळील आंबे वेचण्यासाठी पिंकी केदारी व तिची दोन भावंडे इंदोरी येथील पिंजण मळा येथे गेले होते.तेथील संरक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह होता. याची पुसटशी कल्पनाही पिंकीला नव्हती. विजेचा तीव्र धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला.पिंकी केदारी ही इंदोरी येथील जिल्हा परिषद् प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होती.ती हुशार व गुणी मुलगी होती. आंबे संरक्षित करण्याच्या उद्देशाने सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका बलिकेचा बळी गेला आहे.............सविस्तर चौकशी करून या प्रकरणातील दोषी व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी दिली............* इंदोरी येथील पिंजणमळा येथे सरंक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह सोडण्यात आला होता. त्यासाठी वापरलेली सामग्री जप्त करण्यात आली आहे. सदर प्रवाह सरंक्षण तारेमध्ये कोणी सोडला होता हा तपास चालू आहे.दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
साधना पाटील (सहाय्याक पोलीस निरीक्षक , तळेगाव एम्आईडीसी) ................* संरक्षण कुंपण जाळी मध्ये विद्युत् विजेचा प्रवाह सोडणे हे अनधिकृत आहे.अशा कोणत्याही कामासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कोणतीही कसलीही परवानगी देत नाही .सदर घटने मध्ये रेक्टिफायर च्या मदतीने वीज प्रवाह सोडण्यात आला होता. राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता, विज वितरण कंपनी, उपविभाग तळेगाव दाभाडे