पिंपरी : दिवाळीनंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही शाळांमधील शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे ९ वी ते १२ वीच्या शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानंतर कोरोनाची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे पत्रक महापालिकेने काढले आहे.
राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. स्थानिक प्रशासनाने अंतिम निर्णय घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यावेळी नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी जाहीर केला होता. त्या आदेशाला शनिवारी आयुक्तांनी १३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
--संमतीपत्रास अल्प प्रतिसाद
शाळेत मुलांना पाठवायचे का नाही हा निर्णय पालकांना घ्यायचा आहे. त्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्यक आहे. परंतु, अद्याप संमतिपत्र देण्यास पालकांचा अल्प प्रतिसाद आहे. पालिकेच्या शाळांमध्ये संमतिपत्र देण्याला प्रतिसाद असून, खासगी शाळेत अद्याप १० ते १५ टक्के पालकांनी संमतिपत्र दिले आहे.---लॉकडाऊनची अफवासोशल मीडियावर लॉकडाऊनबाबत मेसेज व्हायरल झाले असून, लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, राज्य शासनाने दिलेल्या आधीच्या आदेशानुसारच सर्व व्यवहार सुरू राहणार असून, लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय राज्य सरकार किंवा महापालिकेने घेतलेला नाही.