लोणावळा : जागतिक स्काऊट-गाईड दिनानिमित्त भाजे गावातील शाळेत मुलांना स्काऊट, गाईड स्कार्फ वाटप करण्यात आले. स्काऊट, गाईड चळवळीला १ आॅगस्ट रोजी ११० वर्षे पूर्ण झाली. हा दिवस जगातील सर्व स्काऊट-गाईड विद्यार्थी जागतिक स्कार्फ दिवस म्हणून साजरा करतात.इंडियन स्काऊट-गाईड फेलोशिप लोणावळा गिल्डचे उपाध्यक्ष डॉ. अमोल कालेकर यांनी या निमित्ताने विद्यालयाच्या १५० विद्यार्थ्यांना स्कार्फ व वॉगल भेट दिले. या ठिकाणी विविध देशांतील स्कार्फचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.कार्यक्रमासाठी भाजे गावच्या सरपंच शिल्पा दळवी, माजी विद्यार्थी संघाचे संतोष दळवी, डॉ. कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी रोहिदास डिकोळे, तानाजी यादव, मकरंद गुर्जर, सुनीता ढिले आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते स्कार्फचे अनावरण व वितरण झाले. शाळेतील १५० विद्यार्थ्यांचे स्काऊट, गाईडचे पथक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. पुणे भारत स्काऊट-गाईड संस्थेचे सहायक जिल्हा आयुक्त विजयकुमार जोरी यांनी स्काऊट चळवळीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ. कालेकर म्हणाले की, प्रत्येकाने अभिमानाने स्कार्फ परिधान करावा व स्काऊट ध्येयानुसार सदैव इतरांना मदतीसाठी आपण तयार राहावे. प्राचार्य प्रकाश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट शिक्षक संतोष तळपे, योगेश कोठावदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आर्ट आॅफ लिव्हिंगच्यावतीने कार्यशाळातळेगाव दाभाडे : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक आंबी, तळेगाव दाभाडे येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे तीन दिवसीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. एम. डी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत आर्ट आॅफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्या अॅड. शमिका वैद्य यांनी गुणवत्ता व जीवन कौशल्य विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी घेऊन १३ विद्यार्थ्यांची बार्कलेज फाउंडेशनमध्ये निवड करण्यात आली.
स्काऊट, गाईड्सना स्कार्फचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:32 AM